लोटे एमआयडीसीत प्लॉटमधील साहित्याला भीषण आग
हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे लाखोंचे साहित्य खाकः दीड तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यातः ग्रामस्थांकडून प्लॉट व्यवस्थापन धारेवर
रत्नागिरी
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील आल्ड्रफ केमिकलच्या नावे असलेल्या प्लॉटमधील साहित्याला लागलेल्या आगीत हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. रविवार दुपारी 2 च्या सुमारास ही आग लागली. दीड तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समोर आले नाही.
औद्योगिक विकास महामंडळाकडून एका व्यक्तीने अल्ड्रफ केमिकलच्या नावाने काही एकराचा प्लॉट विकत घेतला होता. हा प्लॉट सदर मालकाने हिंदुस्तान युनिलिव्हर नामक कारखान्याला साहित्य ठेवण्यासाठी भाडेतत्त्वावर दिला होता. रविवारी दुपारी हे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या दुर्घटनेनंतर पंचक्रोशीतील संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचून प्लॉटशी संबंधित व्यवस्थापनाला धारेवर धरले.
एमआयडीसीतील अग्निशामक दलातील जवानांची तप्तरता
आग लागल्याची माहिती मिळताच समजताच लोटे एमआयडीसी अग्निशामक दलातील जवानांनी तत्परतेने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे मोठा अनर्थ टळला. पाठीमागच्या बाजूला असलेल्या घरडा केमिकल्स आणि यूएस विटामिन या कारखान्यांच्या प्लांटला हानी पोहोचली नाही. आग आटोक्यात आल्यानंतर साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. अग्निशामक पथकामध्ये उप अग्निशमन अधिकारी ए. जी. सरवदे, प्रमुख अग्निशमन विमोचक व्ही. एन. देसाई, व्ही. एस. खेडेकर, चालक एम. एस. मोरे यांच्यासह पी. आर. कांबळे, व्ही. व्ही. कारंडे, व्ही व्ही शिंदे, दिलीप उत्तेकर यांनी रणरणत्या उन्हात भडकलेली आग दीड तासांच्या अथक प्रयत्नाने आटोक्यात आणण्यासाठी दाखवलेल्या तप्तरतेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.