हडफडेतील क्लबमध्ये भीषण आग
23 जणांचा गुदमरून मृत्यू : अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न : मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा दाखल
प्रतिनिधी/ म्हापसा
घटनेची माहिती मिळताच पिळर्ण, म्हापसा, पणजी येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्याच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरु होते. आगीत होरपळून जखमी झालेल्यांना त्वरित म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्याचे काम सुरु होते. घटनेची माहिती मिळताच कळंगुट, हणजूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत सुरु केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच स्थानिक नागरिकांनीही धाव घेऊन मदत कार्याला हातभार लावला. उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरु होते. दरम्यान, आगीने रौद्ररुप धारण केलेले असल्याने आग विझविण्यात व मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे नक्की कितीजण आतमध्ये अडकले असतील याचा अंदाज लावता येत नाही. तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मायकल लोबो यांच्याकडून पाहणी
आमदार मायकल लोबो यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात सखोल चौकशीची त्यांनी मागणी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उशिरा घटनास्थळी दाखल झाले.