For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग

10:15 AM Feb 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
कार सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग
Advertisement

सुमारे 20 पेक्षा जास्त गाड्या जळून खाक : विजापूर शहरातील दुर्घटना

Advertisement

वार्ताहर/विजापूर

शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वरील एचएमके कार सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग लागून सुमारे 20 पेक्षा जास्त गाड्या जळून खाक झाल्या आहेत. हणमंत कनमडी यांच्या मालकीच्या या सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्ती व सर्व्हिससाठी उभ्या असलेल्या विविध कंपन्यांच्या गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीच्या ज्वाळांमुळे संपूर्ण सर्व्हिस सेंटर जळून खाक झाले असून, दुकानात ठेवलेले सुमारे 35 लाख रुपयांचे कारचे सुटे भागही आगीत नष्ट झाले आहेत. जळालेल्या गाड्यांची एकूण किंमत एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, घटनेच्या वेळी सर्व्हिस सेंटरमध्ये कोणीही उपस्थित नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून आग आजूबाजूच्या परिसरात पसरू नये याची खबरदारी घेत ती नियंत्रणात आणली. घटनेच्या ठिकाणी गोलगुंबज व विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.