मिरजेत सहा महिन्यांपासून बंद असलेल्या दुकानाला भीषण आग
दीड लाखांचे नुकसान; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
मिरज :
शहरातील राजर्षी शाहू महाराज चौक येथील स्क्वेअर इन अपार्टमेंटमधील बंद असलेल्या दुकान गाळ्याला गुरुवारी रात्री सुमारे ११.४५ वाजता अचानक भीषण आग लागली. सदर दुकानात पूर्वी इलेक्ट्रिक दुचाकींचे शोरूम होते, मात्र ते गेल्या सहा महिन्यांपासून बंद होते.
या आगीत दुकानातील फर्निचर व अन्य साहित्य जळून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे, गाळ्यामध्ये वीज मीटरच नसताना ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप अस्पष्ट आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला सूचना दिली. विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी तातडीने कारवाई करत आग आटोक्यात आणली.
या दुकानाजवळच इतर दुकाने आणि एक राष्ट्रीयकृत बँक, तसेच वरच्या मजल्यावर रहिवासी घरं असल्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे तो टळला.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आगीच्या घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.