चीनमध्ये रेस्टॉरंटला भीषण आग, 22 ठार
अनेक जण जखमी : लियाओनिंग प्रांतात घडली दुर्घटना
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या लियाओनिंग प्रांताच्या लियाओयांग शहरात मंगळवारी भीषण दुर्घटना घडली आहे. लियाओनिंगच्या एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली आहे. रेस्टॉरंटमधील या आगीत 22 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याचबरोबर या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले आहेत.
लियाओयांग शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत आगीच्या ज्वाळांदरम्यान स्वत:चा जीव वाचवत लोक पळत असल्याचे दिसून येते. रेस्टॉरंटमध्ये मंगळवारी दुपारी 12.25 वाजता आग लागली होती. अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचेपर्यंत आगीने विक्राळ रुप धारण केले होते. या भीषण दुर्घटनेनंतर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी जखमी लोकांवर उपचारासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्देश दिला आहे.
चीनमध्ये अशाप्रकारच्या दुर्घटना होण्याचे प्रमाण अधिक आहे. यापूर्वी 9 एप्रिल रोजी चीनच्या हेबई प्रांतात एका नर्सिंग होमला आग लागली होती, या दुर्घटनेत 20 वृद्ध लोकांचा मृत्यू झाला होता.