पाकिस्तानात नमाजादरम्यान भीषण स्फोट, 23 ठार
खैबर पख्तूनख्वामध्ये आत्मघाती स्फोट : 50 जण जखमी
वृत्तसंस्था, कोहाट
पाकिस्तानात खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या कोहाट जिल्ह्यात पोलीस स्थानक भागात शुक्रवारी नमाजादरम्यान मशिदीनजीक भीषण स्फोट झाला. या स्फोटात 23 जणांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर मशिदीबाहेर झालेल्या स्फोटातील पीडित प्रामुख्याने पोलीस कर्मचारी आहेत. या स्फोटानंतर परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
हा एक आत्मघाती हल्ला होता, स्फोटानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार देखील केला आहे. तर एका इमारतीत आणखी एक आत्मघाती स्फोट झाला असल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने मशिदीच्या बाहेरील हिस्सा पूर्णपणे तुटला आहे. स्फोटानंतर परिसरात खळबळ उडाली असून प्रारंबिक तपासानुसार पोलीस स्थानक परिसराच्या प्रवेशद्वारावर विस्फोटकांनी भरलेले एक वाहन धडकविण्यात आले होते.
खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी या घटनेचा पूर्ण अहवाल मागविला आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य करणे चुकीचे असून हा प्रकार कुठल्याही स्थितीत सहन केला जाऊ शकत नाही. दहशतवाद्यांच्या अशा कृत्यांमुळे देशाची हिंमत संपणार नसल्याचे आफ्रिदी यांनी म्हटले आहे. कोहाटमध्ये यापूर्वीही मोठे हल्ले झाले आहेत. 2010 साली पोलीस वसाहतीत एक बॉम्बस्फोट झाला होता, ज्यात 20 जणांना जीव गमवावा लागला होता. मृतांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे प्रमाण अधिक होते. तर 90 हून अधिक जण जखमी झाले होते.