इराणच्या खोंडाब हेवीवॉटर प्रकल्पाचे प्रचंड नुकसान
इस्रायलचा हवाई हल्ला : संचालन ठप्प झाल्याचे आयएईएचे वक्तव्य
पश्चिम आशियात वाढत्या तणावादरम्यान इस्रायलने इराणच्या खोंडाब (अराक) हेवीवॉटर प्रकल्पावर हवाई हल्ला केला आहे. हल्ल्यामुळे प्रकल्पाचे नुकसान झाले असून तो आता काम करत नसल्याची पुष्टी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) दिली आहे. ही माहिती उपग्रहीय छायाचित्रे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
खोंडाबा प्रकल्प महत्त्वपूर्ण का?
हा प्रकल्प इराणच्या अराक शहरानजकी स्थित असून याला अराक न्युक्लियर कॉम्पलेक्सही म्हटले जाते. येथे ‘हेवी वॉटर’ तयार केले जाते, ज्याचा वापर खास प्रकारच्या आण्विक संयंत्रात होत असतो. तज्ञांनुसार अशा संयंत्रांद्वारे प्लूटोनियम देखील तयार केले जाऊ शकते, ज्याचा वापर अण्वस्त्रांमध्ये केला जाऊ शकतो. याचमुळे हा प्रकल्प दीर्घकाळापासून आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय राहिला आहे.
आयएईएच्या अहवालात काय?
प्रकल्पाला गंभीर नुकसान झाले असून तो आता संचालनात नाही आणि येथे कुठलीच घोषित आण्विक सामग्री नव्हती असे आयएईएने स्पष्ट पेल आहे. याचा अर्थ किरणोत्सर्ग किंवा तत्काळ आण्विक धोक्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही.
इस्रायलने का केला हल्ला?
हा हल्ला गुप्तचर माहितीच्या आधारावर करण्यात आला होता असा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे. हा प्रकल्प इराणच्या आण्विक कार्यक्रमाचा महत्त्वाचा हिस्सा होता. इराणने आंतरराष्ट्रीय करारांनंतरही या प्रकल्पाला पूर्णपणे सुरक्षित केले नाहीत आणि येथून भविष्यात शस्त्रास्त्र दर्जाचे प्लूटोनियम निर्माण होण्याचा धोका होता असा दावा इस्रायलने केला आहे.
वाढता तणाव अन् पुढील धोका
इस्रायलच्या या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव आणखी वाढला आहे. इराण आणि इस्रायलदरम्यान पूर्वीच तणाव शिगेला पोहोचला असताना अशाप्रकारच्या कारवाईमुळे स्थिती आणखी बिघडू शकते. आगामी काळात या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आणि कूटनीतिक हालचालींना वेग येऊ शकतो असे तज्ञांचे मानणे आहे.