लोकराजाला अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला
कोल्हापूर :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त दसरा चौकातील शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जनसागर उसळला होता. जिल्हा प्रशासनासह जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांनी लोकराजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दिवसभर अभिवादनासाठी दसरा चौकात लोकांची अलोट गर्दी होती. करवीरकरांनी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी लोकराजाची जयंती साजरी केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने समता दिंडी काढण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिंडीला प्रारंभ करण्यात आला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी दिलेले योगदान व त्यांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर यावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने समता दिंडी काढण्यात आली. या दिंडीला दसरा चौक येथून प्रारंभ झाला, व्हिनस कॉर्नर, माईसाहेब महाराजांचा पुतळा, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय मार्गे पुन्हा दसरा चौकात दिंडीची सांगता करण्यात आली. या दिंडीत जवळपास 30 पेक्षा अधिक शाळां-महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा करून शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थीनींनी हालगीच्या तालावर लेझिम आणि लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. लहान-थोरांसह हजारो विद्यार्थी व करवीरवासियांनी दिंडीत सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी केलेली राजर्षी शाहू महाराज यांची वेशभूषा, विविध देखावे, हालगीचा कडकडाट, लेझिम, लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण या दिंडीचे मुख्य आकर्षण होते. पोलिस बँडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘रयतेचा लोकराजा माझा, सक्तीचे शिक्षण नसेल तर दंड, वंदन लोकराजाला, राधानगरी धरणाचे उपकार, प्रजेसाठी वसतिगृहे, दाजीपुरची वनसंपदा, दूरदृष्टीचा लोकराजा, शिक्षण क्षेत्रातले नवे प्रयोग अशा आशयाच्या फलकाच्या माध्यमातून लोकराजाच्या कार्यावर शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला. राजर्षी शाहू महाराज की जय अशा घोषणांनी दसरा चौक दुमदुमला होता. विद्यार्थ्यांनी काढलेल्या ग्रंथ दिंडीत राजर्षी शाहू चरित्र ग्रंथ, संविधानाची प्रत आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते. ग्रंथ दिंडी फुलांनी सजवण्यात आली होती, पालकमंत्री आबिटकर यांनीही ग्रंथ दिंडीचे सारथ्य केले.
जिल्हा प्रशासनाच्या समता दिंडीमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कातिकेयन, आमदार जयंत आसगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आदिल फरास, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डींगचे गणी आजरेकर, तृतीय पंथी. विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- दिवसभर विविध संस्था, संघटनांकडून लोकराजाला अभिवादन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांकडून दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दिवसभर कोल्हापुरवासियांची दसरा चौकात अभिवादनासाठी गर्दी झाली होती. सचिन टीम टॉपर अकॅडमीच्या चिमुकल्यानंनी स्केटींगच्या माध्यमातून लोकराजाला अभिवादन केले.
- राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीतर्फे अडीज हजार लाडू वाटप
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दसरा चौकात राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीतर्फे अडीज हजार लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले, अनिल कुरणे, हरी कांबळे, सुभाष कांबळे, शंकर पाटील, पद्माकर कांबळे, सोहेल कांबळे, आदर्श भोसले, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई आदी उपस्थित होते.