दगडी बांधकाम आणि कोल्हापूरचा लौकिक...कोल्हापुरात शनिवारी, रविवारी कार्यशाळा
कोल्हापूर प्रतिनिधी
बांधकामात आधुनिकता जरूर आली आहे. पण त्याचबरोबर जुनी धाटणी आणि जुने तंत्र वापरण्यावरचा कलही वाढला आहे. जुन्या धाटणीच्या बांधणीला त्यामुळे पुन्हा नवे चांगले दिवस आले आहेत आणि या बदलात कोल्हापूरचे बांधकाम विश्व नावारुपास येत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जुन्या धाटणीचे दगडी बांधकाम व प्राचीन मंदिरांची स्थापत्यशैली या खास विषयावरच्या अभ्यासासाठी देशातील नामवंत आर्किटेक्ट येत्या शनिवारी 15 आणि रविवारी 16 रोजी एकत्र येत आहेत. बदलत्या नव्या तंत्राचा आधार घेत जुन्या धाटणीचे बांधकाम हा इथल्या अभ्यासाचा विषय आहे.
करवीर तालुक्यातील खाटांगळे येथे बदललेले तंत्र व त्याआधारे जुन्या धाटणीचे विठ्ठलाईचे मंदिर उभे राहत आहे. त्या मंदिराच्या आवारातच या कार्यशाळेचा एक कृतीशील भाग असणार आहे. पूर्वीपासून बांधकामात वापरला जाणारा दगड, दगडाची वैशिष्ट्यो, दगडाची घडणावळ व दगडाची जोडणी व बांधकाम तंत्र, मंदिर स्थापत्यशास्त्र, मंदिरातील झरोके, नैसर्गिक प्रकाश, खेळता वारा या सर्व अंगाने या कार्यशाळेत तज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. केवळ मंदिरच नव्हे तर, दगडातून निवासस्थाने जुन्या धाटणीचे वाडे, शाळा, सांस्कृतिक हॉल, खुली सभागृहे, व्हरांडे सज्जे बांधणे सुलभ होणार आहे. दगडाचे बांधकाम खर्चिक व अवघड वाटत असले तरी नव्या साधनांचा, तंत्राचा वापर केल्यामुळे दगडी बांधकामेही आता सुलभ झाली आहेत.
खाटांगळे येथे केवळ दगडाचा वापर करून श्री विठ्ठलाई मंदिराची उभारणी होत आहे. वीट, लोखंड, सिमेंट, वाळू, लाकडी तुळ्या याचा एक टक्काही या बांधकामात वापर नाही. या मंदिराची चर्चा सर्वत्र आहे. या मंदिराच्या रचनेला राष्ट्रीय पातळीवरचा नुकताच पुरस्कारही मिळाला आहे. त्यामुळे हे मंदिर कार्यशाळेच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा घटक असणार आहे. आर्किटेक्ट संतोष रामाने, सानिया कुलकर्णी व खटांगळे ग्रामस्थांच्यावतीने ही अभिनव कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत देशातील दिग्गज आर्किटेक्ट शिरीष बेरी, सत्येंद्र भगत, प्रवीण माळी, अभिनंदन मगदूम, सदाशिव कुंभार मार्गदर्शन करणार आहेत.
परिसरात अलीकडे दगडी बांधकामात बांधकामावरचा भर वाढला आहे. दगडी बांधकाम नक्कीच अवघड वाटणारी गोष्ट आहे. कारण दगड घडवणारे कसबी कारागीर कमी आहेत. दगडी वास्तू उभारणारे तंत्रज्ञ कमी आहेत. या परिस्थितीत आधुनिक तंत्राचा वापरही दगडाच्या घडणावळीसाठी घेतला जात आहे. दगड उचलण्यासाठी क्रेन आहे. त्यामुळे दगड बांधकाम सुलभ झाले आहे आणि कोल्हापुरात त्याचा विविध पातळ्यांवर वापर वाढला आहे. म्हणून कोल्हापूर हे या तंत्रातले एक शहर म्हणून ही नावारूपास पुढे येऊ लागले आहे.
दगडाची देणगी....
सांगरूळ, खाटांगळे परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या खासगी जागेत असलेल्या दगडी शिळा, जुने दगड मंदिराच्या उभारणीसाठी देणगी म्हणून दिले आहेत, हे दगड घडवण्यासाठी, कापण्यासाठी एक वर्कशॉपही उभे करण्यात आले आहे.