मार्क्सवादी दिसानायक होणार श्रीलंकेचे राष्ट्रपती
रानिल विक्रमसिंघे यांचा मोठा पराभव : आर्थिक संकटावर मात करण्याचे दिसानायके यांच्यासमोर आव्हान
वृत्तसंस्था/ कोलंबो
आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या श्रीलंकेतील राष्ट्रपती निवडणुकीत मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके हे विजयी ठरले आहेत. तरीही त्यांना मिळालेली मते पाहता दिसानायके हे श्रीलंकेचे पुढील राष्ट्रपती होणार आहेत. दिसानायके यांना 49.8 टक्के मते मिळाली आहेत. तर समागी जन बालावेगयाचे नेते सजित प्रेमदासा यांना 25.8 टक्के मते मिळाली.
वर्तमान राष्ट्रपती आणि युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे यांना 16.4 टक्के मते मिळू शकतील. गोटाबाया राजपक्षे यांनी पद सोडल्यावर 6 वेळा पंतप्रधान राहिलेल्या विक्रमसिंघे यांनी जुलै 2022 मध्ये अंतरिम राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता.
अनुरा कुमारा दिसानायके यांच्या पक्षाचे नाव जनता विमुक्ती पेरेमुना (जेव्हीपी) आहे. नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) आघाडीत हा पक्ष सामील आहे. अनुरा कुमारा हे या आघाडीचे उमेदवार होते. अनुरा कुमारा यांचा पक्ष अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप, कमी कर आणि अधिक बंदिस्त बाजारपेठ यासारख्या आर्थिक धोरणांचे समर्थन करतो. 55 वर्षीय अनुरा कुमारा दिसानायके यांची श्रीलंकेतील प्रतिमा ही उत्साहपूर्ण भाषण करणारा नेता अशी आहे.
संसद सभागृह भंग करण्याचे आश्वासन
अनुरा कुमारा यांच्या पक्षाचे संसदेत केवळ तीन खासदार आहेत. परंतु दिसानायके यांनी भ्रष्टाचारविरोधी ठोस पाऊल आणि गरिबांच्या हिताकरता धोरणे लागू करण्याच्या स्वत:च्या आश्वासनांमुळे लोकप्रियता मिळविली आहे. बदल घडवून आणणारा नेता अशी प्रतिमा त्यांनी मांडली आहे. राष्ट्रपती म्हणून निवडून आलो तर 45 दिवसांमध्ये संसदेचे सभागृह विसर्जित करण्याचे आश्वासन अनुरा यांनी प्रचारात दिले होते.
आर्थिक संकटाची पार्श्वभूमी
2022 मध्ये विदेशी चलन साठा खालावल्याने श्रीलंकेला अभूतपूर्व आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. स्थिती बिघडल्याने इंधन, औषधे आणि गॅस सिलिंडर समवेत आवश्यक सामग्रीची आयात करण्यासही श्रीलंका असमर्थ ठरला होता. महागाई आणि आवश्यक वस्तूंच्या टंचाईमुळे संतप्त लोकांनी राष्ट्रपतींचे कार्यालय आणि निवासस्थानावर कब्जा केला होता. यानंतर तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना देशातून पलायन करावे लागले होते आणि नंतर राजीनामा द्यावा लागला होता. श्रीलंका अद्याप या संकटातून पूर्णपणे सावरलेला नाही.