मारुतीची सुधारित ब्रिझा 24 जुलैला होणार लाँच
वृत्तसंस्था, मुंबई
देशातील आघाडीवरची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपली नवी सुधारित ब्रिझा 24 जुलै रोजी लाँच करणार आहे. एसयुव्ही गटातील ही कार अनेक नव्या वैशिष्ट्यांसह बाजारात येणार आहे. एसयुव्ही गटामध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या इराद्याने मारुती सुझुकीने सुधारित ब्रिझाला उतरविण्याचे निश्चित केले आहे.
नेक्सॉन, ब्रिझा यांच्यात स्पर्धा
मारुतीची ही सुधारित ब्रिझा प्रतिस्पर्धी टाटा नेक्सॉनला टक्कर देणार आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये काही काळाकरीता ब्रिझा ही एसयुव्ही गटात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली होती. मात्र आर्थिक वर्ष 2026 मध्ये टाटाच्या नेक्सॉनने या गाडीला मागे टाकण्यात यश मिळविले. आर्थिक वर्ष 2026 मध्ये 2,16,000 नेक्सॉनची विक्री झाली होती. तर ब्रिझा 1,80,000 हून अधिक विक्री झाल्या होत्या. आर्थिक वर्ष 2025 मध्ये 1,89,000 हून अधिक कार्सच्या विक्रीसह ब्रिझाने आघाडी राखली होती. यावर्षी नेक्सॉनने 1,63,000 हून अधिक कार्सची विक्री केली होती. आर्थिक वर्ष 2024 मध्ये दोघांमध्ये कट्टर स्पर्धा रंगली होती.
आर्थिक वर्ष 2026 मध्ये एसयुव्हीची बाजी
आर्थिक वर्ष 2026 मध्ये एसयुव्ही गटामध्ये एकंदर 11,95,000 इतक्या कार्सची विक्री झाली आहे. एकंदर सर्व प्रकारातील कार विक्रीमध्ये पाहता एसयुव्ही कार्सचे योगदान वाढले आहे. एसयुव्ही कार्सचे प्रमाण 45 टक्के इतके होते. या गटामध्ये ब्रिझा आणि नेक्सॉन यांची तर एकमेकांशी काटे की टक्कर आहेच. याशिवाय मारुतीची फ्राँक्स, ह्युंडाईची व्हेन्यु, किया सोनेट, महिंद्राची एक्सयुव्ही 3 एक्सओ, महिंद्रा बोलेरो, स्कोडा कायलॅक आणि टोयोटा अर्बन व्रुझर टेसर यासारख्या गाड्याही या गटात स्पर्धा करत आहेत. 2016 मध्ये पहिल्यांदा मारुतीने ब्रिझाचे सादरीकरण केले होते. तेव्हापासूनच या गाडीची लोकप्रियता ग्राहकांमध्ये कायम राहिली आहे. या गटातील सेकंड जनरेशन मॉडेलला 2022 मध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. एकंदर 14 लाख इतक्या वाहनांची विक्री करण्यात आली होती.
नव्या गाडीविषयी
या गाडीत 1.5 लिटर नॅच्युरली अॅस्पीरेटेड पेट्रोल इंजिन असणार असून पाच स्पीड मॅन्यूअल किंवा सहा स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. ही गाडी सीएनजी पर्यायासहही येणार आहे. या गाडीमध्ये काही सौंदर्यवर्धक बदल करण्यात आले आहेत. 1.0 लिटर टर्बे पेट्रोल इंजिनसह ही गाडी सादर करणार आहे. सध्याला असा पर्याय फ्राँक्स ही गाडी देते.