मारुतीच्या फ्राँक्सचा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रम
2 लाख वाहनांच्या निर्यातीचे गाठले लक्ष्य
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशातील दिग्गज कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने फ्राँक्स या एसयुव्ही गटातील कार्सच्या निर्यातीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीने 38 महिन्यांच्या अवधीत 2 लाख इतक्या फ्राँक्सची निर्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर केली आहे.
एसयुव्हीच्या निर्यातीला सुरुवात 2023 मध्ये झाली होती तेव्हापासून विदेशातील बाजारात कार्सची मागणी वाढीव राहिली आहे. कंपनीचा गुजरातमध्ये हंसलपूर येथे निर्मिती कारखाना आहे जिथे कंपनी या एसयुव्हीचे उत्पादन घेते. निर्यातीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या 25 महिन्यातच पाहता कंपनीने 1 लाख वाहनांची निर्यात करण्यात यश मिळवलं होतं. त्यानंतर पुढचा 1 लाख वाहनांच्या निर्यातीचा टप्पा कंपनीने 13 महिन्यात गाठला आहे. यावरुन फ्राँक्स या गाडीला भारताबाहेर इतर देशांमध्ये चांगला प्रतिसाद लाभत आहे, हे सिद्ध होते. सध्याला ही गाडी जपानसह जवळपास 90 देशांना निर्यात केली जात आहे.
काय म्हणाले सीईओ
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ हिसाशी ताकेऊची म्हणाले की कंपनीने 2 लाख वाहनांची केलेली निर्यात एक मोठी उपलब्धी आहे. उत्पादन क्षमता सक्षम व कर्मचाऱ्यांच्या अतुट मेहनतीमुळे हे कार्य साध्य करता आल्याचे ते म्हणाले. व्यावसायिक वर्ष 2024-25 पासून फ्राँक्स ही गाडी भारतातील निर्यातीतील एकमेव चांगला प्रतिसाद लाभलेली प्रवासी कार आहे.
टॉप 3 निर्यातीत मारुतीची झेप
कंपनीनुसार व्यावसायिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत भारतातून निर्यात होणाऱ्या टॉप 3 पॅसेंजर वाहनांमध्ये मारुती सुझुकीच्याच होत्या. यात फ्राँक्ससोबत जिम्नी 5 दरवाजांची व इ विटारा यांचा समावेश आहे. याचदरम्यान कंपनीने भारतातल्या एकंदर पॅसेंजर वाहनांच्या निर्यातीत पाहता 55 टक्के इतकी हिस्सेदारी प्राप्त केली आहे. कंपनीच्या 17 मॉडेल वाहनांना 120 हून देशांमध्ये निर्यात करण्यात येत आहे.