चालू आर्थिक वर्षात मारुतीची पहिली इलेक्ट्रीक कार येणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतातील आघाडीवरची चारचाकी कार निर्माती कंपनी मारुती सुझूकी लवकरच आपली पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार बाजारात लॉन्च करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चालू आर्थिक वर्षामध्येच कंपनी आपली पहिली इलेक्ट्रीक कार बाजारात उतरवेल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये चेअरमन आर. सी. भार्गव यांनी इलेक्ट्रीक कार संदर्भात माहिती दिली. त्याचप्रमाणे कंपनीच्या एकंदर पुढील वाटचालीचीही माहिती त्यांनी दिली. पहिली इलेक्ट्रीक कार आणताना आगामी काळात हायब्रिड आणि सीएनजीवर आधारीत कार्सचे लॉन्चींगसुध्दा चालुच राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. इंधनापासून होणाऱ्या प्रदुषणामध्ये जास्तीतजास्त कपात करण्यासाठी कंपनीचे योगदान यापुढेही राहणार आहे. हायब्रिड, बायोगॅस, फ्लेक्स इंधन आणि सीएनजी यावरील गाड्या यापुढेही बाजारात सादर केल्या जातील.पर्यावरण पूरक इंधनाच्या वापराची वाहने यापुढेही प्राधान्यक्रम देऊन बनविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अनुषंगानेच चालू आर्थिक वर्षात पहिली इलेक्ट्रीक कार कंपनी सादर करणार आहे. यायोगे पेट्रोल व डिझेलच्या कार्सवरील अवलंबत्व कमी करण्याचा कंपनीचा मानस आहे.