मारुती नव्या वर्षात आणणार चार नव्या कार्स
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ष 2024 मध्ये देशातील दिग्गज कारनिर्माती कंपनी मारुती सुझुकी चार नव्या कार्स बाजारात उतरविणार आहे. या सर्व कार्स जुन्याच मॉडेलच्या सुधारित आवृत्त्या असतील, असेही सुझुकीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या नव्या कार्समध्ये मारुतीची स्विफ्ट, डिझायर, एसप्रेसो आणि ईव्हीएक्स यांचा समावेश असणार आहे. सर्वाधिक पसंतीची कार म्हणून स्विफ्ट 2024 च्या जुलै महिन्यामध्ये सुधारित आवृत्तीसह बाजारात दाखल होणार आहे. जीची किंमत अंदाजे 6 लाख रुपये असणार आहे. सहा एअरबॅग्ज, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन यासारख्या आधुनिक सुविधा यात असतील. दुसरीकडे कंपनीची डिझायर ही सुधारित आवृत्तीची कार लाँच होणार असून ती कोणत्या महिन्यात दाखल होणार याचे स्पष्टीकरण मात्र कंपनीने दिलेले नाही. पण नव्या डिझायरची किंमत 7 लाख रुपयांच्या घरात असेल. याच अनुषंगाने एसप्रेसो ही सुधारित आवृत्तीची गाडी नव्या वर्षात भारतीय बाजारात उतरविली जाईल. या गाडीच्या वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आलेली नसली तरी डिझाईन मात्र बदलले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. साडेचार लाख रुपयांपर्यंत या गाडीची किंमत असेल, अशी शक्यता आहे. तसेच कंपनी आपली इलेक्ट्रिक कार व्हीएक्स ही देखील बाजारात दाखल करणार आहे. या गाडीचे मायलेज 550 किमी इतके दमदार असणार आहे.