‘मारुती“ची वाहने 30 हजारपर्यंत महागणार
नवीन दर जून 2026 पासून लागू : उत्पादन खर्च वाढल्याची कंपनीची माहिती
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या प्रवासी वाहनांच्या दरात 30,000 रुपयापर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने वाढवलेले हे नवीन दर जून 2026 पासून लागू होतील. सतत वाढणाऱ्या उत्पादन खर्चामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
मारुतीच्या म्हणण्यानुसार, ही दरवाढ कंपनीच्या सर्व मॉडेल्सवर लागू होणार आहे. दरम्यान, कारची किंमत किती वाढेल हे तिच्या मॉडेल आणि व्हेरिएंटवर अवलंबून असेल. कंपनीने ही माहिती आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिली आहे. अरेना-नेक्साच्या सर्व शोरुममधील मॉडेल्सच्या किमती वाढणार आहेत. कंपनी आपल्या गाड्या दोन वेगवेगळ्या डीलरशिप चॅनेलद्वारे विकते, ज्यात अरेना आणि नेक्सा यांचा समावेश आहे. या दोन्ही चॅनेलद्वारे विकल्या जाणाऱ्या गाड्या जूनपासून महाग होतील.
अरेना मॉडेल्स: अल्टो के10, एस-प्रेसो, सेलेरिओ, वॅगनआर, इको, स्विफ्ट, डिझायर, एर्टिगा, ब्रेझा आणि व्हिक्टोरिस या गाड्यांच्या किमती बदलतील. नेक्सा मॉडेल्स: नेक्सा या प्रीमियम चॅनल अंतर्गत विकल्या जाणाऱ्या बलेनो, फ्रँक्स, ग्रँड व्हिटारा, जिम्नी, एक्सएल6, इन्व्हिक्टो आणि नुकतीच लॉन्च झालेली इलेक्ट्रिक कार- ई व्हिटारा यांच्या किमतीतही वाढ होईल.
यासाठी कंपनीने खर्चात कपात करण्याचे अनेक उपायही अवलंबले होते, जेणेकरून ग्राहकांवर बोजा पडणार नाही. मात्र, बाजारातील महागाईचा दबाव उच्च पातळीवर पोहोचला आहे आणि खर्चाचे प्रतिकूल वातावरण कायम आहे.