शिक्षण क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्त्व मारूती तुळसकर यांचे निधन
वेंगुर्ले (वार्ताहर) -
तुळस-जैतीर मंदिर येथील रहिवासी व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व मारुती बापू तुळसकर (८५) यांचे गुरुवार दि. ६ मार्च रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे व दोन विवाहित मुली असा परिवार आहे.शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या श्री तुळसकर यांना माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचे हस्ते दिल्ली येथे आदर्श राष्ट्रपती पुरस्कार वितरीत करण्यात आला होता. तुळसकर यांच्या शिक्षकी पेशाची सुरुवात रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्यातील आडीवरे शाळा नं. १ या गावातून झाली. सिंधुदुर्ग जिल्हयाच्या निर्मितीनंतर त्यांनी तुळस व होडावडे या गावात ज्ञानदानाचे काम केले. होडावडे या गावात काम करत असताना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचेमार्फत आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला. तुळस गावातील श्रीमंत पार्वती देवी वाचनालयाचे २३ वर्ष ते अध्यक्ष होते. याशिवाय वेंगुर्ले तालुका निवृत्त पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव म्हणून त्यांनी काम केले होते. कुडाळ हायस्कूलचे शिक्षक बाळकृष्ण मारुती तुळसकर, निवृत्त मंडळ अधिकारी बापू मारुती तुळसकर, निवृत्त बँक कर्मचारी सुनील मारुती तुळसकर, तसेच कुडाळ हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका स्नेहल भरत वेंगुर्लेकर यांचे ते वडील होत. तुळसकर त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकास मुकलो असल्याची भावना तुळस पंचक्रोशीतून होत आहे.