मारुती उभारणार ‘या’ राज्यात ईव्ही कारचा कारखाना
जवळपास 35 हजार कोटी रुपयांची करणार गुंतवणूक
वृत्तसंस्था /गांधीनगर
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड गुजरातमध्ये दुसरा उत्पादन कारखाना उभारणार आहे. यासाठी कंपनी 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिरो सुझुकी यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 मध्ये याची घोषणा केली आहे. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिरो सुझुकी यांनी 10 व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 ला संबोधित करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता 2030-31 पर्यंत 40 लाख युनिट्सपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. मारुती सुझुकी इंडियामध्ये सुझुकी मोटर कॉर्पोरेशनची 58 टक्के भागीदारी आहे.
नवीन प्लांटमध्ये 10 लाख युनिट्सचे उत्पादन
नवीन प्लांट दरवर्षी 10 लाख युनिट्सचे उत्पादन करेल आणि गुजरातमध्ये कंपनीचे वार्षिक उत्पादन 20 लाख युनिट्सवर नेईल, सुझुकीने सांगितले. नवीन प्लांटचे कार्य 2028-29 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची सध्या हरियाणा आणि गुजरातमधील दोन उत्पादन कारखान्यांमध्ये प्रतिवर्ष सुमारे 22 लाख युनिट्सची एकूण उत्पादन क्षमता आहे. कंपनी भारतातील उत्पादन वाढवण्यासाठी 11 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह दिल्लीच्या बाहेरील हरियाणातील सोनीपत येथे एक नवीन उत्पादन कारखाना देखील स्थापन करत आहे.
भारतात वाहन उद्योग विस्तारतोय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वाहन उद्योग झपाट्याने विस्तारत असल्याचे सुझुकीचे म्हणणे आहे. त्यामुळेच सध्या भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनली आहे.