मारुती सुझुकीचा नफा 13 टक्क्यांनी मजबूत
वाढीसह नफा कमाई 3,525 कोटींच्या घरात : 99,220 वाहनांची विक्रमी निर्यात
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने बुधवारी आपला चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल सादर केला आहे. यावेळी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीने म्हटले आहे, की डिसेंबर तिमाहीत कंपनीचा स्वतंत्र नफा हा वर्षाच्या आधारावर सरासरी 13 टक्क्यांनी वधारुन तो 3,525 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. मागील वर्षी समान तिमाहीत हा आकडा मात्र 3,130 कोटी रुपये राहिला असल्याची माहिती आहे. एक्सचेंज फाईलिंगनुसार, मारुती सुझुकी इंडियाचा ऑपरेशन्समधून महसूल कमाई ही जवळपास 16 टक्क्यांनी वधारुन 38,492.1 कोटी रुपयावर पोहोचली आहे. मागील वर्षात समान तिमाहीची कामगिरी पाहिल्यास यामध्ये हा आकडा 33,308.7 कोटी रुपये राहिला आहे.
तिमाहीत विक्रमी निर्यात
मारुतीने डिसेंबर तिमाहीत विक्रमी 99,220 वाहनांची निर्यात केली आहे. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत एकूण 5,66,213 वाहनांची विक्री केली. कंपनीची देशांतर्गत बाजारातील विक्री ही 4,66,993 युनिट्स होती. तर निर्यात 99,220 वर राहिली असून हा आतापर्यंतच्या कामगिरीतील उच्चांक राहिला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने 36,802 कोटींची आतापर्यंतची सर्वाधिक निव्वळ विक्री नेंदवली आहे. कंपनीचे समभाग बुधवारच्या सत्रात इंट्रा डे ट्रेडमध्ये 1.51 टक्क्यांनी वधारुन 11940 रुपयांवर व्यवहार करत होते.
हिसाशी ताकेची यांची सीईओपदी नियुक्ती
मारुती सुझुकीने हिसाशी ताकेची यांची एमडी आणि सीईओ म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 1 एप्रिल 2025 पासून त्यांची अतिरिक्त कालावधीसाठी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. 31 मार्च 2022 रोजी निवृत्त झालेल्या केनिची आयुकावा यांची जागा ताकेची यांनी घेतली आहे. ताकेची हे 2019पासून कंपनीच्या संचालक मंडळात कार्यरत आहेत.