मारुती सुझुकीची दहा वर्षातली सर्वोत्तम कामगिरी
अडीच लाखावर पोहचले बुकिंग : निर्यातीतही उत्तम कामगिरी
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने यंदाच्या उत्सवी काळामध्ये मागच्या दहा वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचे पाहायला मिळाले आहे. कंपनीला आतापर्यंत अडीच लाख गाड्यांचे बुकिंग प्राप्त झाले आहे. यासोबतच निर्यातीमध्येही 50 टक्केपेक्षा अधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
डिलिव्हरीत दमदार कामगिरी
दसऱ्यापर्यंत पाहता दोन लाखपेक्षा अधिक गाड्यांची डिलिव्हरी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. कंपनीचे विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी माहिती देताना सांगितले की, यावर्षी ग्राहकांची मागणी आधीच्या तुलनेमध्ये खूप वाढलेली दिसून आली आहे. नवरात्राच्या पहिल्या आठ दिवसांमध्ये 1 लाख 65 हजार वाहनांची डिलिव्हरी करण्यात आली आहे. दसऱ्यापर्यंत पाहता हा आकडा दोन लाखांपर्यंत सहज पोहोचू शकेल. गेल्या दहा वर्षांमध्ये पाहता हा डिलिव्हरीचा आकडा सर्वोत्तम मानला जात आहे. बुकिंगचा विचार करता अडीच लाखांवर बुकिंग कंपनीला प्राप्त झाले आहे. मागच्या वर्षी नवरात्रामध्ये साधारण एक लाखापेक्षा अधिक वाहनांची डिलिव्हरी करण्यात आली होती मात्र यावर्षी त्यामध्ये जवळपास दुप्पट वाढ नोंदवली गेली आहे.
छोट्या शहरात बुकिंगला प्रतिसाद
वाढत्या कार्सची मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन करणारे कर्मचारी रविवारी व सुट्टीच्या दिवशीही काम करत आहेत. कंपनीच्या वाहनांना छोट्या शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यापूर्वी प्रति दिन 10000 वाहनांचे बुकिंग होत होते तर या खेपेला ही संख्या 18 हजारांवर पोहोचली आहे. याचे कारण जीएसटी सवलत मानले जात आहे.