मारुती सुझुकी करणार 7 हजार कोटींची गुंतवणूक
वृत्तसंस्था/गुरुग्राम
भारतातील आघाडीवरची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आगामी काळामध्ये 7410 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. हरियाणामध्ये कंपनीचा नवा कारखाना होणार असून त्याकरिता राज्य सरकारने कंपनीला परवानगी दिली आहे.
किती होणार उत्पादन क्षमता
हरियाणातील खरखोदा या ठिकाणी कंपनी आपला तिसरा कारखाना सुरु करणार असून या कारखान्यामध्ये वार्षिक अडीच लाख मोटारींची निर्मिती केली जाणार आहे. या नव्याने स्थापन केलेल्या कारखान्यानंतर उत्पादनाला सुरुवात झाल्यानंतर 2029 पर्यंत कंपनीची एकंदर कार निर्मिती क्षमता 7.5 लाख इतकी वार्षिक होणार आहे.
हरियाणाचा वाटा अधिक
ग्राहकांकडून होणारी वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी नवा कारखाना उभारत आहे. कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये मारुती सुझुकीने पहिल्यांदाच 20 लाख कारचे उत्पादन घेतले होते. हा एक प्रकारचा इतिहासच होता. सदरच्या उत्पादित गाड्यांपैकी जवळपास 60टक्के गाड्यांची निर्मिती हरियाणातील कारखान्यांमध्ये करण्यात आली आहे. तर 40 टक्के कारचे उत्पादन गुजरातमध्ये घेण्यात आले होते. कंपनीची 20 लाखांवी कार अर्टिगा हरियाणातील मनेसर प्लांटमधून तयार करण्यात आली होती.