मारुती सुझुकी वाहनांच्या किमती वाढवणार
एप्रिलपासून गाड्या होणार महाग : दिग्गज कंपनीचा निर्णय : 32 हजारपर्यंत वाढणार किमत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीवरची चारचाकी निर्माती कंपनी ग्राहकांना पुढील महिन्यात झटका देणार आहे. होय, कंपनी 1 एप्रिलपासून आपल्या वाहनांच्या किमती 4 टक्केपर्यंत वाढवणार असल्याचे समजते.
सदरची घोषणा कंपनीने सोमवारी केली आहे. सदरची वाढ ही कंपनीच्या सर्व मॉडेल्सवर वेगवेगळी असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती तसेच हाताळणी खर्चात झालेली वाढ या पार्श्वभूमीवर कंपनीने 1 एप्रिलपासून पुन्हा किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. किमतीत पाहता मारुती वाहनांच्या किमती 32,500 रुपयांपर्यंत वाढणार आहेत. एक लक्षात घ्या की कंपनीने जानेवारी महिन्यातही किमती 4 टक्के इतक्या वाढवल्या होत्या. त्यावेळी कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ हे कारण कंपनीने दिले होते.
फेब्रुवारीत 1.60 लाख कार विक्री
फेब्रुवारीत मारुतीने 1 लाख 60 हजार कार्सची विक्री केली आहे. फेब्रुवारी 2024 मध्येदेखील एवढ्याच कार्स विकल्या गेल्या होत्या. मासिक तत्वावर पाहता विक्रीत 7 टक्के घट दिसली आहे. जानेवारी महिन्यात यावर्षी कंपनीने 1 लाख 73 हजार कार्सची विक्री करण्यात यश मिळवलं होतं. कंपनीच्या फ्राँक्स मॉडेलला ग्राहकांचा प्रतिसाद लाभतोय, असे दिसून आले आहे.
समभाग वधारला
किमतीत वाढ करणार असल्याच्या बातमीचा परिणाम कंपनीच्या समभागावर शेअरबाजारात पाहायला मिळाला. मारुती सुझुकीचा समभाग शेअरबाजारात सोमवारी 2 टक्के वाढत 11,752 रुपयांवर पोहचला होता. गेल्या वर्षभरात समभाग सपाट स्तरावर कार्यरत आहे. 6 महिन्यातील कामगिरी पाहता समभाग 6 टक्के इतका घसरला आहे.