मारुती सुझुकी : 1.82 लाख वाहनांची विक्री
मागील वर्षांच्या तुलनेत 4 टक्क्यांनी कमी : टाटाची विक्री घटली
नवी दिल्ली :
ऑटोमोबाईल दिग्गज मारुती सुझुकीने ऑगस्ट 2024 मध्ये 1,81,782 वाहनांची विक्री केली आहे. तथापि, मागच्या वर्षाच्या तुलनेत त्यात 4 टक्क्यांनी घट झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये कंपनीने 1,89,082 वाहनांची विक्री केली होती. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने प्रवासी वाहन विभागात 1,43,075 वाहने विकली, जी गेल्या वर्षी 1,56,114 विकण्यात आली होती. त्यात वार्षिक आधारावर 8 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. अलीकडेच देशातील अनेक कंपन्यांनी वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवल्या होत्या.
टाटाच्या विक्रीत 8 टक्के घट
दरम्यान, टाटा मोटर्सने ऑगस्ट 2024 मध्ये घाऊक बाजारात 71,693 वाहनांची विक्री केली आहे. ती वार्षिक आधारावर 8 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने 78,010 वाहनांची विक्री केली होती. ऑगस्टमध्ये, टाटा मोटर्सने देशांतर्गत बाजारात 70,006 वाहनांची विक्री केली, तर 1687 वाहने विदेशात निर्यातीद्वारे विकली गेली. कंपनीने या कालावधीत देशांतर्गत बाजारपेठेत 25,864 व्यावसायिक वाहनांची विक्री केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 16 टक्के कमी आहे.
महिंद्राची विक्री 16 टक्क्यांनी वाढली
गेल्या महिन्यात (ऑगस्ट 2024) देशांतर्गत बाजारात महिंद्र अँड महिंद्राची प्रवासी वाहनांची विक्री 16 टक्के वाढून 43,277 वर पोहचली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ती 37,270 होती. ‘थार रॉक्ससह, आम्ही थार फ्रँचायझीला नंबर बनवण्याच्या दिशेने काम करत आहोत,’ असे विजय नाकरा, अध्यक्ष, ऑटोमोटिव्ह विभाग, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेड यांनी म्हटले आहे.
टोयोटा किर्लोस्कर : विक्री वाढली
टोयोटा किर्लोस्कर मोटरने 30,879 वाहने विकली. वार्षिक आधारावर ही 35 टक्के वाढ आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष साबरी मनोहर के यांच्या मते, कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये एसयूव्ही आणि एमपीव्हीचा मोठा वाटा आहे. ‘मजेची गोष्ट म्हणजे, हा ट्रेंड मोठ्या शहरांपुरता मर्यादित नाही, तर टियर-2 आणि टियर-3 मार्केटमध्येही विस्तारला आहे. म्हणजेच तेथेही आता एसयुव्ही आणि एमपीव्ही कार्सची मागणी वाढते आहे’ मनोहर म्हणाले.