मारुती सुझुकीच्या नफ्यात 48 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीने चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून या कालावधीमध्ये कंपनीने 3878 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. या योगे मारुती सुझुकीने मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत आपल्या नफ्यामध्ये 48 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे.
मारुती सुझुकीने आपला तिमाही निकाल शुक्रवारी जाहीर केला. मारुती सुझुकीने मागच्या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये 2624 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. अनेक तज्ञांनी कंपनीला होणाऱ्या नफ्यासंदर्भात 3046 कोटी रुपयांचे अंदाज वर्तवले होते. जे चुकीचे ठरले. हे अंदाज खोटे ठरवत कंपनीने 3878 कोटी रुपयांचा नफा नोंदला. अपेक्षेपेक्षा जास्त नफा मारुती सुझुकीने मार्चअखेरच्या तिमाहीमध्ये कमावल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान मारुती सुझुकीने लाभांशाची घोषणादेखील केली आहे. संचालक मंडळाने या संदर्भात घोषणा करताना आर्थिक वर्ष 2023-24 करिता 125 रुपये प्रति समभाग लाभांश देण्याचे घोषित केले आहे. शुक्रवारी कंपनीचा समभाग 1.70 टक्के घसरणीसह 12,703 रुपयांवर बंद झाला होता.
2024 आर्थिक वर्षातइतका महसूल
याच दरम्यान कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1 लाख 40 हजार 933 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मार्च तिमाहीमध्ये कंपनीच्या बलेनो व स्विफ्ट या मॉडेल्सच्या विक्रीमध्ये दमदार वाढ दिसून आली आहे.