‘मारुती सुझुकी इंडिया’ची वाहने महागली
ग्राहकांवर भार टाकण्याशिवाय पर्याय नसल्याचा कंपनीचा निर्वाळा : पुढील महिन्यात किमती लागू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मारुती सुझुकी इंडियाने किमतीत वाढ जाहीर केली आहे. ही वाढ कंपनीच्या लाइनअपमधील सर्व मॉडेल्समध्ये बदलणार आहे. नवीन किमती 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू होणार असल्याची माहिती आहे. तसेच या किमती 1,500 रुपयांपासून 32,500 रुपयांपर्यंत वाढवल्या जातील असे मारुतीने म्हटले आहे.
जानेवारीच्या सुरुवातीलाही कंपनीने स्वत:च्या लाइनअपमधील सर्व मॉडेल्सवर 4 टक्के पर्यंत किंमत वाढ केली होती. वाढत्या इनपुट आणि ऑपरेशनल कॉस्टमुळे मारुतीने हा निर्णय घेतला आहे. सेलेरियोकरता सर्वाधिक किंमत वाढ करण्यात आली आहे.ही किंमत 32,500 रुपयांनी वाढवली आहे, तर सियाझ, जिमनीच्या किमती 1,500 रुपयांनी वाढल्या आहेत.
मारुती सुझुकीने डिसेंबर 2024 मध्ये 1,78,248 कार विकल्या, हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा 30 टक्केपेक्षा जास्त आहे. यामध्ये देशांतर्गत विकल्या गेलेल्या 1,32,523 युनिट्स, निर्यात केलेल्या 37,419 युनिट्स आणि इतर ओइएमला विकल्या गेलेल्या 8,306 युनिट्सचा समावेश आहे.
मारुती सुझुकीने दुसऱ्या तिमाहीत 3,069 कोटींचा नफा नोंदवला.
मारुती सुझुकीने 2024-25 आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) 3,069 कोटी रुपयांचा स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला आहे. तो वर्ष-दर-वर्ष आधारावर 17 टक्के कमी आहे. एका वर्षापूर्वी जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 3717 कोटी रुपये नफा झाला होता.
जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा परिचालन महसूल 37,203 कोटी रुपये होता. जुलै-सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीने 37,062 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते. वार्षिक आधारावर, त्यात 0.37 टक्क्यांची किंचित वाढ झाली.