मारुती सुझुकीचा कार निर्यातीत विक्रमी टप्पा
30 लाख कार्सची निर्यात : 17 मॉडेल्स पाठवल्या विदेशात
बेंगळूर :
देशातील आघाडीवरची ऑटो निर्माती कंपनी मारुती सुझुकीने निर्यातीमध्ये विक्रम प्रस्थापित केला आहे. एकंदर 30 लाख कार्सची निर्यात कंपनीने केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड 100 हून अधिक देशांमध्ये सध्याला आपल्या 17 मॉडेल्सची निर्यात करते आहे. ही निर्यात सध्याला 30 लाखापर्यंत पोहोचली आहे. लॅटीन अमेरिका, आफ्रिका, आशिया आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये मारुतीने आपल्या कार्सची निर्यात केली आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत कंपनीने 1,81,444 कार्सची निर्यात केली आहे. निर्यातीमध्ये वर्षाच्या आधारावर पाहता कंपनीने 17 टक्के वाढ नोंदवली आहे.
काय म्हणाले सीईओ
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाशी ताकेची म्हणाले, मारुती सुझुकीने देशांतर्गत पातळीवर विक्रीवर भर देतानाच निर्यातीबाबतीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजघडीला कंपनी भारतातून 40 टक्के इतक्या पॅसेंजर कार्सची निर्यात करते आहे. याबाबतीमध्ये कंपनी आघाडीवरची निर्यात कंपनी म्हणून गणली जाते. विदेशातून कंपनीच्या वाहनांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे. दर्जा, सुरक्षितता, रचना आणि तंत्रज्ञान या बाबतीमध्ये कंपनी कोठेही कमी पडलेली नाही. परिणामी ग्राहकवर्गाचा प्रतिसाद कायम राहिलेला आहे.
असा गाठला टप्पा
1986 मध्ये पहिल्यांदा कंपनीने कार्सच्या निर्यातीला सुरुवात केली. 2012-13 मध्ये 10 लाख कार्सच्या निर्यातीचे लक्ष गाठण्यात आले. 20 लाख ते 30 लाख वाहनांच्या निर्यातीचा टप्पा 3 वर्ष 9 महिन्यांमध्येच गाठण्यात आला. हे यशही कंपनीसाठी महत्त्वाचे ठरले.