मारुती सुझुकीला निर्यात वाढीचा लाभ
नफा 3792 कोटींवर : पहिल्या तिमाहीचा निकाल घोषित: 40,493 कोटींचे उत्पन्न
वृत्तसंस्था/ नोएडा
ऑटो क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी मारुती सुझुकीने जूनला संपलेल्या तिमाहीत 3792 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. निर्यात वाढीमुळे नफ्यात कंपनीने वाढ नोंदवल्याचे कारण सांगितले जात आहे.
देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी म्हणून मारुती सुझुकीची ओळख आहे. कंपनीने जूनच्या तिमाहीत मागच्या वर्षी 3760 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. तर या तिमाहीत कंपनीने 40,493 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न प्राप्त केले आहे. वर्षामागे हेच उत्पन्न 36,840 कोटी रुपयांचे होते. पहिल्या तिमाहीत वाहन विक्रीतून कंपनीने 36,625 कोटी रुपये प्राप्त केले आहेत.
पहिल्या तिमाहीत देशांतर्गत बाजारातील ग्राहकांची मागणी फारशी उत्साहवर्धक नोंदवली गेली नाही. पण सदरच्या तिमाहीत कंपनीच्या विदेशात कार्सना प्रतिसाद चांगला लाभल्याने नफ्यात वाढ नोंदवता आली आहे.
टीव्हीएसची नफ्यात 32 टक्के वाढ
याचदरम्यान ऑटो क्षेत्रातील दुचाकी निर्मिती कंपनी टीव्हीएस मोटर्सनेही तिमाही निकालाची आकडेवारी जाहीर केलेली असून कंपनीने नफ्यात 32 टक्के वाढ नोंदवली आहे. एवढेच नाही तर कंपनीने सदरच्या तिमाहीत सर्वाधिक वाहन विक्रीची नेंद केली आहे. जूनअखेरच्या तिमाहीत कंपनीचा नफा 32 टक्के वाढीसोबत 610 कोटी रुपयांवर पोहचला. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 461 कोटीचा नफा नेंदवला होता. यंदा कंपनीने सदरच्या तिमाहीत 12250 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न प्राप्त केले आहे.