नोव्हेंबरमध्ये मारुतीने विकल्या 1 लाख 34 कार्स
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नोव्हेंबर महिन्यामध्ये मारुती सुझुकीने 1 लाख 34 हजार कारची विक्री करण्यामध्ये यश मिळवले आहे. प्रवासी वाहनांची विक्री मागच्या महिन्यात काहीशी नरमाईतच राहिली होती. कार विक्रीत ह्युंडाईने नोव्हेंबर महिन्यात 48002 कार्सची विक्री केली होती तर टाटा मोटर्सने 46,037 वाहनांची विक्री करत तिसरा नंबर पटकावला होता. महिंद्रा आणि महिंद्रा यांनी 30,392 वाहनांची विक्री नोव्हेंबर महिन्यात केली आहे.
उत्सवी काळामुळे कार विक्रीत मागच्या महिन्यात काहीसा उत्साह कायम राहिला आहे. गेल्या काही महिन्यांतील विक्रीच्या तुलनेत मात्र नोव्हेंबरमध्ये काहीशी घसरण दिसली आहे. आघाडीवरची कंपनी मारुती सुझुकी आणि ह्युंडाई मोटर इंडिया यांनी अनुक्रमे विक्रीत 1.3 टक्के, 3.1 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. सलग 11 व्या महिन्यात कार विक्रीत उत्साह राहिला आहे. सेमी कंडक्टरच्या नियमीत पुरवठ्यामुळे वाहनांच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे ग्राहकांना अपेक्षीत कार्सचा पुरवठा कंपन्यांना वेळेवर करता येणं शक्य झालं आहे.
मारुतीकडे कार्सच्या बुकिंगमध्ये वृद्धी
मारुती सुझुकीच्या बुकिंगमध्येदेखील 7 टक्के इतकी वाढ दिसली आहे. 2 लाख 6 हजार वाहनांचे बुकिंग कंपनीकडे सध्याला आहे. त्यांचे वितरण करण्याचे काम कंपनी करते आहे. एसयुव्ही गटातील वाहनांची मागणी याखेपेसही वाढीव दिसून आल्याचे मारुतीने म्हटले आहे. ह्युंडाईच्या एसयुव्ही कार्सनी बाजारात विक्रीत 68 टक्के इतका लक्षणीय वाटा उचलला आहे. यावर्षी पहिल्यांदाच कंपनीला 40 लाख वाहन विक्रीचा यशस्वी टप्पा गाठता आला आहे. याखेरीज आगामी काळासाठी 1 लाख वाहनांचे बुकिंगही कंपनीकडे प्राप्त झाले आहे.