सणासुदीच्या पूर्वीच मारुतीच्या विक्रीत 24 टक्क्यांची वाढ
सप्टेंबरमध्ये 2.36 लाख वाहनांची विक्री
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने सप्टेंबर 2026 मधील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. सणासुदीच्या हंगामापूर्वी कंपनीच्या वाहन विक्रीत मोठी वाढ दिसून आली आहे. विशेष बाब म्हणजे युटिलिटी वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली आहे. तथापि, कंपनीची एकूण विक्री बाजाराच्या अंदाजापेक्षा किंचित कमी झाल्याचे समजते. मारुती सुझुकीने सप्टेंबर 2026 मध्ये एकूण 2.36 लाख युनिट्सची विक्री केली आहे.
सप्टेंबर 2026 मध्ये मारुती सुझुकीची एकूण विक्री 2.36 लाख युनिट्स इतकी झाली आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत कंपनीच्या एकूण विक्रीत सुमारे 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि, बाजाराला कंपनीकडून सुमारे 2.38 लाख वाहनांची विक्री अपेक्षित होती. त्यामुळे, प्रत्यक्ष विक्री अंदाजापेक्षा किंचित कमी आहे.
कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये देशांतर्गत बाजारपेठ, इतर वाहन कंपन्यांना पुरवठा आणि परदेशात निर्यात केलेल्या वाहनांचा समावेश आहे. सप्टेंबरमध्ये मारुतीने देशांतर्गत बाजारात 1,85,252 वाहनांची विक्री केली, तर इतर वाहन कंपन्यांना 6,542 वाहनांचा पुरवठा केला. याशिवाय, कंपनीने 44,219 वाहनांची निर्यातही केली आहे.
सप्टेंबर 2026 मध्ये, मारुती सुझुकीच्या युटिलिटी वाहनांच्या विक्रीत वार्षिक तुलनेत 62 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने या श्रेणीत 78,911 वाहनांची विक्री केली आहे. प्रवासी कारच्या विक्रीतही वाढ झाली आहे. सप्टेंबर 2026 मध्ये, कंपनीने 91,887 प्रवासी कार विकल्या, जे गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 24 टक्क्यांनी जास्त आहे. त्याच वेळी, हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री 18 टक्क्यांनी वाढून 3,414 युनिट्सवर पोहोचली..
छोट्या कार्सचे महत्त्व कायम
विविध कार्सच्या प्रकारात पाहता छोट्या कार्सच्या विक्रीत सातत्याने वाढ दर्शवली जात आहे. सप्टेंबरमध्ये या कार्सचा वाटा 34 टक्के इतका राहिला आहे. हॅचबॅक व सेडॉन या प्रकारातील कार्सनाही मजबूत मागणी दिसून आली. बलेनोची विक्री 25 हजारपार पोहचली असून स्विफ्ट कारची विक्री 80 हजार ते 90 हजार इतकी राहिली होती.
टाटा मोटर्सच्या विक्रीला वेग
सप्टेंबर महिन्यात, टाटाच्या विक्रीत वार्षिक आधारावर 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, 2026-27 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत, टाटा मोटर्सच्या एकूण प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर 40 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीमध्ये इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांच्या वाढत्या मागणीची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्याचबरोबर, कंपनीने सप्टेंबरमध्ये विक्रीचा नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.
टाटा मोटर्सची ईव्ही विक्री
टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणीही वेगाने वाढत आहे. दुसऱ्या तिमाहीत, कंपनीने एकूण 47,150 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली, तर गेल्या वर्षी याच कालावधीत 24,855 वाहने विकली होती. अशाप्रकारे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महिंद्राने विकल्या 64 हजार गाड्या
महिंद्रा आणि महिंद्रा यांनी देशांतर्गत बाजारात 64,092 गाड्यांची विक्री केली आहे. मागच्या वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत 14 टक्के अधिक विक्री राहिली आहे. तर ह्युंडाईने सप्टेंबरमध्ये 57,166 इतक्या गाड्यांची विक्री देशांतर्गत बाजारात केली. जी मागच्या वर्षाच्या समान महिन्याच्या तुलनेत 10 टक्के अधिक आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीने 51,547 वाहनांची विक्री केली होती.