मारुतीने ग्रँड विटाराची 39,506 वाहने परत मागविली
इंधन पातळी निर्देशक आणि प्रकाश प्रणालीत दोष
नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने तांत्रिक बिघाडामुळे 39,506 वाहने परत मागवली आहेत. कंपनीच्या रिकॉलमध्ये 9 डिसेंबर 2024 ते 29 एप्रिल 2025 दरम्यान उत्पादित केलेल्या लोकप्रिय एसयूव्ही ग्रँड विटाराच्या मॉडेल्सचा समावेश आहे. या रिकॉलचे कारण इंधन पातळी निर्देशक आणि चेतावणी प्रकाश प्रणालीमध्ये संभाव्य तांत्रिक दोष आहे. मारुती सुझुकीने नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.
प्रकाश इंधन पातळीत त्रुटी
कंपनीचे म्हणणे आहे की या वाहनांच्या स्पीडोमीटर असेंब्लीमधील इंधन गेज आणि कमी इंधन चेतावणी प्रकाश इंधन पातळी योग्यरित्या प्रदर्शित करू शकत नाहीत. यामुळे चालकाला चुकीची इंधन माहिती मिळू शकते, ज्यामुळे लांब अंतर किंवा महामार्गावर ड्रायव्हिंग करताना समस्या उद्भवू शकतात. कंपनीने म्हटले आहे की मर्यादित संख्येतील वाहनांमध्ये ही समस्या आढळून आली आहे, सुरक्षितता लक्षात घेऊन, सर्व प्रभावित वाहने परत मागवण्यात आली आहेत. सर्व संबंधीत कार मालकांना शोरुमशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
ग्राहकांकडून शुल्क नाही
मारुती सुझुकीची अधिकृत कार्यशाळा मॉडेल्ससंबंधी संबंधीतांशी संपर्क साधेल.मालकांना दोषपूर्ण भाग बदलण्याबद्दल माहिती दिली जाईल. दोषयुक्त भाग बदलण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ग्रँड विटारा परत मागवण्याच्या घटना...
- मारुती सुझुकीने यापूर्वी 24 जानेवारी 2023 रोजी 11,177 युनिट्स परत मागवल्या
- कंपनीने 18 जानेवारी 2023 रोजी 17,362 गाड्या परत मागवल्या
- 2022 उत्पादित केलेल्या एकूण 9,125 गाड्या परत मागवल्या
- गेल्या वर्षी, मारुती सुझुकी इंडियाने देखील त्यांच्या तीन मॉडेल्स वॅगन आर, सेलेरियो आणि इग्निसच्या 9,925 गाड्या परत मागवल्या होत्या.