नवीन वर्षापासून मारुतीची कार महागणार
1 जानेवारीपासून नवे दर लागू होणार : सर्व मॉडेल्सवर 4 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
ह्युंडाई मोटार इंडिया नंतर आता भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने देखील पुढील महिन्यापासून कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सर्व मॉडेल्सवर ही वाढ 4 टक्केपर्यंत असेल. वाढलेले दर 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार असल्याचे कंपनीने शुक्रवारी म्हटले आहे.
एक दिवसापूर्वी गुरुवारी ह्युंडाई मोटार इंडियाने देखील नवीन वर्षापासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 25,000 रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली होती. दुसरीकडे इतर कंपन्या मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडी यांच्या कारही नव्या वर्षीपासून महागणार आहेत. सर्वच कंपन्यांनी किमती वाढवण्यामागे एकच कारण दिले आहे. अंतर्गत खर्च व वाहतुक खर्चात वाढ झाल्याने कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.
मारुती सुझुकी सर्वात मोठी कार कंपनी
मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेत त्यांची हिस्सेदारी 40 टक्के आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये कंपनीने 1.44 लाख कार्स विकल्या. त्यात वार्षिक आधारावर 7.46 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने देशांतर्गत बाजारात 1.34 लाख कार विकल्या होत्या.
युटिलिटी व्हेईकल सेगमेंटमध्ये, ब्रिझा, ग्रँड विटारा यासह एसयूव्हीच्या विक्रीत वार्षिक सुमारे 17 टक्के वाढ झाली आहे. मारुती सुझुकीने दुसऱ्या तिमाहीत 3,069 कोटींचा नफा कमावला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) 3,069 कोटी रुपयांचा स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला आहे. तो वर्षाच्या आधारावर 17 टक्के कमी आहे. वर्षभरापूर्वी जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला 3717 कोटी रुपयांचा नफा झाला होता.