6 लाख सीएनजी वाहनांच्या विक्रीचे मारुतीचे उद्दिष्ट
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशातील आघाडीवरील ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी इंडिया यांनी चालू आर्थिक वर्षात (2024-25) जवळपास 6 लाख सीएनजी वाहनांची विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेमध्ये विक्रीचे लक्ष 25 टक्के अधिक ठेवण्यात आले आहेत. मारुती सुझुकी कंपनीने या संबंधीची माहिती गुरुवारी माध्यमांना दिली आहे. बुधवारी कंपनीने प्रिमीयम हॅचबॅक स्विफ्ट एस- सीएनजी इंधनासोबत सादर केली आहे.
काय म्हणाले वरिष्ठ अधिकारी
कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (विपणन आणि विक्री विभाग) पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की, मागच्या वर्षी कंपनीने 4.77 लाख सीएनजी वाहनांची विक्री केली होती. चालू आर्थिक वर्षामध्ये पाहता एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान 2.21 लाख सीएनजी वाहने विक्री करण्यामध्ये यश मिळविले आहे. नवी स्विफ्ट तीन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आली आहे. ज्यांची किंमत अनुक्रमे 8.19 लाख, 8.46 लाख, आणि 9.19 लाख रुपये इतकी असणार आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार सदरची स्विफ्ट गाडी सीएनजी इंधनावर जवळपास 32 किलो मीटरचे अंतर गाठू शकणार आहे.
2010 पासून उत्पादन
2010 पासून भारतात कंपनी सीएनजी वाहनांचे उत्पादन घेत आहे. तेव्हापासून आजपर्यंत पाहता कंपनीने 20 लाखहून अधिक एस-सीएनजी वाहने विक्री केली आहेत. यायोगे पर्यावरणाला सहाय्य होईल, अशी भूमिका कंपनीने घेतली असून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यामध्ये मोलाचा वाटा कंपनीने उचलला आहे.