For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमाभागात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा

12:00 PM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
सीमाभागात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा
Advertisement

मध्यवर्ती म. ए. समितीचे आवाहन : घटक समित्यांनी बैठका घेऊन जागृती करावी

Advertisement

बेळगाव : भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर अन्यायाने बेळगावसह 865 खेडी कर्नाटकात डांबण्यात आली. या निषेधार्थ 17 जानेवारी 1956 रोजी करण्यात आलेल्या आंदोलनावर कर्नाटकी पोलिसांनी बेछूट गोळीबार केल्याने पाच हुतात्मा झाले. तेव्हापासून सीमाभागात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो. त्याप्रमाणे येणाऱ्या 17 जानेवारीला बेळगाव शहरातील हुतात्मा चौक आणि कंग्राळी खुर्द येथे मराठी भाषिकांनी दरवर्षीप्रमाणे हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले.

गुरुवारी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. सुरुवातीला सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना गोपाळराव देसाई म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जावा. घटक समित्यांनी बैठका घेऊन जागृती करावी. शहरात शहर समिती तर कंग्राळीत तालुका समिती आणि खानापूर तालुक्यात खानापूर म. ए. समितीच्यावतीने हुतात्मा दिन पाळला जातो. मराठी भाषिकांनी 17 रोजी सुतक दिन म्हणून पाळावा, असे ते म्हणाले.

Advertisement

खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले, सीमाभागात 17 जानेवारीला सर्व मराठी भाषिकांनी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा. सीमाप्रश्नाच्या सुनावणीला सुरुवात होणार असल्याने यावेळी यश येण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. अॅड. एम. जी. पाटील म्हणाले, शहरातील हुतात्मा चौकात शहर समितीतर्फे अभिवादन करून फेरी काढली जाते. त्याचबरोबर तालुका समितीतर्फे कंग्राळी खुर्द येथे सकाळी 8.30 वा. हुतात्मा मारुती बेन्नाळकर व बाळू निलजकर यांना अभिवादन केले जाते. त्यामुळे सर्वांनी उपस्थित रहावे. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हुतात्म्याच्या वारसांची पेन्शन बंद होऊ नये यासाठी वर्षातून एकदा लाईफ सर्टिफिकेट व केवायसी करणे गरजेचे आहे.

लक्ष्मण होनगेकर म्हणाले, 17 जानेवारी रोजी सर्वांनी गांभीर्याने हुतात्मा दिन पाळावा. घटक समित्यांच्यावतीने मराठी भाषिकांच्या गाठीभेटी घेऊन जागृती करावी. माजी महापौर मालोजी अष्टेकर म्हणाले, बेळगावातील सर्व मराठी भाषिकांनी पक्षाचा झेंडा विसरून मराठीसाठी झगडणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील नेतेमंडळींना निवेदने, पत्रव्यवहार करून उत्तर मिळत नाही. तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले म्हणाले, हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणे गरजेचे आहेच. बेळगावात हैदास घालणाऱ्या कन्नडिगांच्या पाठीशी कोणी नाही. बाहेरून येणारेच वेठीस धरत आहेत.  हुतात्मा स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे ते म्हणाले. यावेळी मोनाप्पा पाटील, अनिल पाटील, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, अजित पाटील, मनोहर हुंदरे, रावजी पाटील, मल्लाप्पा गुरव, बी. ओ. येतोजी, मोनाप्पा संताजी, राजू मरवे, जयराम देसाई, रविंद्र शिंदे, विलास बेळगावकर, रणजीत चव्हाण-पाटील आदी उपस्थित होते.

येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे निवेदन

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची 31 मार्च 2025 रोजी म. ए. समितीचे माजी अध्यक्ष शांताराम कुगजी यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्रचना करण्यात आली होती. त्यानुसार नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पण काहींनी आपली वेगळी चूल मांडत लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला. आपली समिती खरी आहे असे भासविण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकीसाठी प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे मध्यवर्ती म. ए. समितीने यावर तोडगा काढावा, अशा मागणीचे निवेदन येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्यावतीने बैठकीत देण्यात आले.

Advertisement
Tags :

.