मार्टिन गुप्टीलचा क्रिकेटला निरोप
ऑकलंड : न्यूझीलंडचा भरवशाचा फलंदाज मार्टिन गुप्टीलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. मात्र आणखी काही दिवस आपण टी-20 लिग स्पर्धांमध्ये खेळणार असल्याचे सांगितले. 38 वर्षीय गुप्टीलने न्यूझीलंड संघाकडूनचा आपला शेवटचा सामना 2022 साली खेळला होता. न्यूझीलंडमध्ये खेळविल्या जात असलेल्या सुपरस्मॅश स्पर्धेत गुप्टील ऑकलंड एसीसचे नेतृत्व करतो. गुप्टीलने न्यूझीलंडकून क्रिकेटच्या विविध प्रकारात एकूण 367 सामने खेळले आहेत. त्याने 47 कसोटी तसेच 198 वनडे आणि 122 टी-20
सामने खेळले आहेत. गुप्टीलने 198 वनडे सामन्यात 18 शतके आणि 39 अर्धशतकांचा 7346 धावा जमविल्या आहेत. तसेच त्याने 122 टी-20 सामन्यात 2 शतके आणि 20 अर्धशतकांसह 3561 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेट प्रकारात पदार्पणात शतक झळकविणारा गुप्टील हा न्यूझीलंडचा पहिला क्रिकेटपटू आहे. तसेच त्याने 2015 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत द्विशतक झळकविले होते. 2019 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.