शिवथर येथे गळा चिरुन विवाहितेचा खून
सातारा, गोडोली :
शिवथर (ता. सातारा) गावात राहत असलेली 25 वर्षीय विवाहितेचा अज्ञाताने सोमवारी दुपारी गळा चिरुन खून केला. पूजा प्रथमेश जाधव असे तिचे नाव आहे. घटनास्थळी तालुका पोलिसांनी पोहचून पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. शेजारी राहणाऱ्या आजीमुळे ही खूनाची घटना उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पूजा जाधव हिचे घर शिवथर गावापासून मालगाव रोडवर 1 कि. मी. अंतरावर आहे. पूजा जाधव हिचा 2017 मध्ये विवाह झाला असून, सध्या घरामध्ये सासू आनंदीबाई, सासरे निवृत्ती जाधव, पती प्रथमेश जाधव, मुलगा यश जाधव राहतात. सोमवार दि. 7 जुलै रोजी घरातील सासू-सासरे हे शेतामध्ये तर पती प्रथमेश जाधव हा सातारा येथील आनंद ट्रेडर्समध्ये सकाळी साडेनऊ नंतर मुलाला शाळेत सोडून कामाला गेले. राहत्या घरामध्ये पूजा जाधव ही एकटीच असताना ही घटना घडली असावी. दुपारच्या दरम्यान घरातील सर्व दरवाजे उघडे असल्यामुळे शेजारी राहत असणारी आजी घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी पुजाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. हे पाहून त्यांनी आरडाओरडा केला. गावात राहणाऱ्या सर्वांनी पूजाच्या घराच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना देण्यात आली. हा सर्व प्रकार समजला तेव्हा शेजाऱ्यांनी शेतामध्ये कामाला गेलेल्या सासू-सासऱ्यांना बोलावून घेतले. तर प्रथमेश जाधव यालाही संपर्क करुन बोलून घेतले.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डी.वाय.एस.पी. राजीव नवले, ए.पी.आय. मोर्डे, एपीआय नेवसे. पी.एस.आय. गुरव, पी.एस.आय. शिंदे, हवालदार मालोजी चव्हाण, ए.एस. माने, आर.जी. गोरे, कुमटेकर, शिखरे, वायदंडे, फडतरे, पांडव, गाव महसूल अधिकारी विशाल पवार, माजी पोलीस पाटील भारत पाटील, त्याचबरोबर घटनास्थळ श्वान पथक दाखल झाले होते. पोलिसांनी घटना स्थळी पोहचून पंचनामा सुरू केला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.