पळून जाऊन लग्नास नकार दिल्याने विवाहितेचा खून
सातारा :
शिवथर (ता. सातारा) गावातील विवाहिता पूजा प्रथमेश जाधव (वय 25) हिचा सोमवारी दुपारी खून करण्यात आला. या खुनाचा छडा आठ तासात लावत सातारा तालुका पोलिसांनी तिच्या प्रियकर संशयिताला जेरबंद केले आहे. अक्षय रामचंद्र साबळे (वय 28) असे त्याचे नाव आहे. तो शिवथर गावचा रहिवासी असून गेल्या सहा वर्षापासून दोघांचे प्रेमसंबंध होते. पळून जाऊन लग्न करण्यास तिने नकार दिल्याने त्याने खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मयत पूजा जाधव व अक्षय साबळे यांचे गेल्या सहा वर्षापासून प्रेम संबंध होते. काही दिवसांपूर्वी तिने अक्षयशी बोलने बंद केले होते. यामुळे दोघांच्यात सतत वाद होत होते. अक्षयने तिच्या मागे पळून जाऊन लग्न करण्याचा तगादा लावला. परंतु ती लग्नास नकार देत होती. याचा राग मनात धरून सोमवारी दुपारी पूजा घरात एकटी असल्याचा फायदा घेत अक्षयने तिचा धारदार शस्त्राने खून केला. तिच्या घराशेजारी राहणाऱ्या आजीला घराचे दार उघड दिसल्याने ती आत गेल्यावर पूजाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी राजीव नवले, एपीआय मोर्डे, एपीआय नेवसे. पीएसआय गुरव, पीएसआय शिंदे, हवालदार मालोजी चव्हाण, ए. एस. माने, आर. जी. गोरे, कुमठेकर, शिखरे, वायदंडे, फडतरे, पांडव, गाव महसूल अधिकारी विशाल पवार, माजी पोलीस पाटील भारत पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर श्वान पथकही दाखल झाले होते. पोलिसांना हा खून तिचा प्रियकर अक्षयने केल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी वेगवेगळी पथके तयार करून अक्षयला शोधण्यास पाठविली.
साहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे व पथकाला अक्षय हा पुण्यात स्वारगेट परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी स्वारगेटला जाऊन अत्यंत शिताफीने पहाटे त्याला अटक केली. अवघ्या आठ तासात खुनाच्या गुह्याचा छडा लावण्यास सातारा तालुका पोलिसांना यश आले.