विवाहितेने गळा कापून संपविले जीवन
आटपाडी :
गोमेवाडी येथील पंचवीस वर्षीय विवाहितेने चाकूने स्वत:चा गळा कापून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला आहे. कोमल उर्फ ऐश्वर्या चंद्रकांत साळुंखे असे मयतेचे नाव असून या घटनेने गोमेवाडीसह तालुक्यात खळबळ माजली आहे. तर पोलिसांनी घातपाताच्या अनुषंगाने तपासाला गती दिली आहे.
गोमेवाडीचे पोलीस पाटील शामराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद आहे. कोमल उर्फ ऐश्वर्या साळुंखे हिचे सासर वलवण (ता. आटपाडी) आहे. तिचा विवाह सुमारे दीड वर्षापुर्वी झाला आहे. ती सध्या माहेरी गोमेवाडी येथे आई-वडिलांकडे राहण्यास होती. तिला एक लहान मुलगा आहे. तिने राहत्या घरी चाकूने गळा कापून घेऊन आत्महत्या केली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे.
कोमल उर्फ ऐश्वर्याच्या मृतदेहाजवळच्या अनेक घटनांबाबत संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या याचा तपास आटपाडी पोलीस करत आहेत. डीवायएसपी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक विनय बहिर, सपोनि रमेश जाधव, विशेंद्रसिंग बायस, पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी घेवुन पाहणी केली.
गोमेवाडीत घडलेल्या घटनेत प्रथमदर्शनी आत्महत्येचा प्रकार वाटत असलातरी त्यामध्ये घातपाताचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मंगळवारी डीवायएसपी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक विनय बहिर व अन्य अधिकाऱ्यांनी दिवसभर मयत विवाहितेच्या कुटुंबियांची चौकशी केली. घटनेची वस्तुस्थिती उजेडात आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून सर्व शक्यता पडताळून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. मयत कोमल उर्फ ऐश्वर्या हिच्याबाबत अनेक गोष्टींचा उलगडा मृत्युनंतर होत असून पोलिसांच्या 112 क्रमांकावर सातत्याने कॉल करून पोलीसांनाही तिने यापूर्वी हैराण केल्याचे स्पष्ट झाले आहे.