43 वर्षांमध्ये 12 वेळा विवाह अन् घटस्फोट
एकेकाळी विवाहाचे नाते हे अखेरच्या श्वासासोबतच संपुष्टात यायचे. परंतु काळ बदलण्यासोबत नातेही लवकर संपुष्टात येऊ लागले. सद्यकाळात विवाह जितक्या धुमधामात होतात, लोक तितक्याच सहजपणे घटस्फोटाची घोषणा करतात आणि अनेकदा तर पार्टीही देतात. दांपत्याने विवाहाच्या अनेक वर्षांनी घटस्फोट घेणे ही नवी बाब नाही. परंतु ऑस्ट्रियात एका अशा दांपत्याची कहाणी समोर आली आहे, ज्याने परस्परांना 43 वर्षांमध्ये 12 वेळा घटस्फोट दिला आणि विवाह केला आहे.
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात ही अजब घटना उघडकीस आली आहे. एका वृद्ध जोडप्याने मागील 43 वर्षांमध्ये परस्परांशी 12 वेळा विवाह केला आणि दर 3 वर्षांनी घटस्फोट घेतला आहे. असे का घडले असावे असा प्रश्न यामुळे अनेकांना पडला. वृद्ध महिलेच्या पतीचा मृत्यू 1981 मध्ये झाला होता. त्यानंतर तिने अन्य इसमाशी विवाह केला. या जोडप्यामध्ये खूप प्रेम होते आणि ते आदर्श जोडप्याप्रमाणे मागील 43 वर्षांमध्ये एकत्र एकाच घरात राहतात. त्यांच्यात कुठलेच वाद झालेले नाहीत असे शेजाऱ्यांचे सांगणे होते. मग अखेर दर तीन वर्षांनी घटस्फोट घेत पुन्हा विवाह का करण्यात आला असा प्रश्ऩ उपस्थित झाला.
सरकारची फसवणूक
ऑस्ट्रियाच्या कायद्यातील एका तरतुदीचा हे जोडपे 43 वर्षांपासून गैरफायदा घेत होते. तेथील धोरणानुसार जर एखादी महिला विधवा झाल्यावर एकटी राहत असेल तर सरकारकडून तिला 28,300 डॉलर्स म्हणजेच 24 लाख रुपयांचा भत्ता देते. अशास्थितीत महिला जितक्या वेळा कायदेशीर स्वरुपात घटस्फोट घेत होती, तितक्याच वेळा तिला सरकारी भत्ता मिळत होता. मे 2022 मध्ये ही महिला 12 व्या घटस्फोटानंतर पेन्शन इन्शोरन्स इन्स्टीट्यूटमध्ये पोहोचली होती. यावेळी झालेल्या तपासणीत संबंधित महिला एकाच इसमासोबत विवाह करून भत्ता मिळविण्यासाठी घटस्फोट घेत असल्याचे उघड झाले. आता या दांपत्याच्या विरोधात खटला भरण्यात आला आहे. तिचा 12 वा घटस्फोट मंजूर झाला नसल्याने दोघांवरही संयुक्तपणे खटला चालणार आहे.