For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लग्ना’ अजूनही लहान...बालविवाह रोखण्याचे आव्हान

11:45 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘लग्ना’ अजूनही लहान   बालविवाह रोखण्याचे आव्हान
Advertisement

चार महिन्यांत 59 बालविवाह रोखले : हेल्पलाईनला मुलांचा प्रतिसाद, चार महिन्यांत 228 कॉल

Advertisement

बेळगाव : गेल्या चार महिन्यांत 59 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. जिल्हा बालसंरक्षण विभागाकडून चालविल्या जाणाऱ्या हेल्पलाईनला चार महिन्यांत 228 कॉल आले असून त्यामुळेच बालविवाह रोखण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. उपलब्ध माहितीनुसार बालविवाह रोखण्यासाठी फोन करणाऱ्यांमध्ये बहुतेक महिला व मुलींचाच समावेश आहे. याआधी जिल्हा बालसंरक्षण विभागाची हेल्पलाईन-1098 चाईल्ड लाईन इंडिया फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहकार्यातून चालविण्यात येत होती. 1 सप्टेंबर 2023 पासून सरकारनेच ही हेल्पलाईन चालविण्यास घेतली आहे. गेल्या चार महिन्यांत 228 हून अधिक जणांनी 1098 या हेल्पलाईनशी संपर्क साधून लहान मुलांसंबंधीच्या समस्या मांडल्या आहेत. शाळकरी मुलांनीही शाळेत येणाऱ्या समस्या, कौटुंबिक समस्या हेल्पलाईनच्या माध्यमातून मांडल्या आहेत, असे बालसंरक्षण विभागातील अधिकारी सांगतात.

24 तास हेल्पलाईन सुरू असते. तक्रार येऊन केवळ तासाभरात वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन संबंधित मुलांना मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातात. गेल्या चार महिन्यांत हेल्पलाईनच्या माध्यमातून आलेले 59 फोन कॉल बालविवाह रोखण्यासाठी मदतीचे ठरले. शहरातील वेगवेगळ्या भागात भीक मागणाऱ्या मुलांसंबंधीही 16, कुटुंबीयांपासून हरवलेल्या मुलांसंबंधी 24, बालकामगारांविषयी 9, शारीरिक छळाविषयी 6 तक्रारी आल्या आहेत. काही मुलांना निवासाची सोय करण्याची गरज होती. यासंबंधीही नागरिकांनी हेल्पलाईनशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर त्यांची सोय करण्यात आली आहे. शाळाबाह्या मुलांसंबंधी 22 फोन कॉल आले आहेत. तर कौटुंबिक समस्या असणाऱ्या 11 मुलांनी हेल्पलाईनच्या माध्यमातून आपले गाऱ्हाणे मांडले. प्रेमप्रकरणांसंबंधीही पालकांचा होणारा विरोध, सामाजिक समस्या याविषयीही हेल्पलाईनशी संपर्क साधून मुले आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.