सख्ख्या बहिण-भावाचा विवाह
स्वत:च्या सख्ख्या बहिणीशी विवाह करणे हे प्रत्येक संस्कृतीत निषिद्ध मानले गेले आहे. कायद्याच्या दृष्टीनेही असा विवाह अवैध मानला जातो. तथापि, थायलंड या देशातील काही समाजांमध्ये अशी सख्ख्या भावंडांचा विवाह करण्याची परंपरा आहे. या देशात असे अनेक विवाह आतापर्यंत झालेले आहेत, विशेष म्हणजे, अशा विवाहांना या देशातही कायदेशीर मान्यता नाही. तथापि, ते होत आहेत आणि या देशाचे प्रशासन कायद्याचे शस्त्र हाती असूनही असे विवाह रोखू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सख्ख्या बहिणीचा भावाशी विवाह ही परंपरा या देशातील काही समाजांमध्ये पवित्र मानली जाते. त्यामुळे कायद्याकडे दुर्लक्ष करुन ती पाळली जाते. प्रशासन याकडे पहात राहण्याशिवाय दुसरे काही करु शकत नाही. या देशातील समुत प्रकान प्रदेशात असे विवाह ही सामान्य बाब आहे.
मात्र, ही प्रथा एका विशिष्ट परिस्थितीच पाळली जाते. एखाद्या मातेला, जुळी पुत्र आणि कन्या झाली, तर त्या दोघांचा, ते वयात आल्यानंतर विवाह केला जातो. जुळे बहीण-भाऊ मागच्या जन्मीचे प्रियकर-प्रेयसी असतात, अशी या भागात समजूत आहे. मागच्या जन्मात त्यांचा विवाह होऊ न शकल्याने त्यांना जुळे बहीण -भाऊ म्हणून आता जन्म मिळाला आहे, असा समज प्रचलित आहे. त्यामुळे त्यांच्या मागच्या जन्मातील प्रेम या जन्मात लग्नात रुपांतरीत करण्यासाठी त्यांचा विवाह केला जातो. या समजुतीला बौद्ध धर्मातील पुनर्जन्माच्या सिद्धांताचा आधार दिला जातो. पण तो चुकीचा आहे, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. थायलंडच्या सरकारने अशा विवाहांवर आणि या प्रथेवर बंदी घातली असूनही ते या भागात होतात. अशी जुळ्या बहीण भावांची अनेक जोडती या प्रदेशात असून या जुळ्या बहीण-भावाचे मातापिता हेच त्यांचे सासूसासरेही असतात.