आयटी, धातूच्या तेजीने बाजार भक्कम
इस्रायल -इराणच्या वाढत्या तणावातही सेन्सेक्स -निफ्टी वधारले
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील नव्या आठवड्याचा प्रारंभ मोठ्या उत्साहाने भारतीय शेअरबाजारात झाला आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मात्र सेन्सेक्स व निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले होते. मात्र चालू आठवड्याची सुरुवात अडथळ्याची राहणार असल्याचे संकेत शेअरबाजार अभ्यासकांनी व्यक्त केले होते. परंतु सोमवारच्या सत्रात मुख्य क्षेत्रांपैकी आयटी, धातू, तेल आणि रिअल्टी यांचे समभाग राहिल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक भक्कम राहिले. इस्राएल आणि इराणमधील वाढत्या भू-राजकीय तणावा असूनही, भारतीय शेअर बाजारांनी ताकद दाखवली आणि सोमवार, 16 जून रोजी मोठी तेजी नोंदवली. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी50 मध्ये सुमारे 1 टक्क्यांनी वाढ झाली. आयटी, धातू, रिअल्टी आणि तेल समभागांमध्ये वाढ राहिली.
दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 677.55 अंकांनी वाढून 81,796.15 वर बंद झाले. याच वेळी, निप्टी 227.90 अंकांच्या वाढीसह 24,946.50 वर बंद झाला. इस्रायल आणि इराणमधील अणुस्थळे आणि तेलाशी संबंधित पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांमुळे बाजार गोंधळात पडले, ज्यामुळे सुरुवातीच्या व्यापारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. तथापि, नंतरच्या व्यापार सत्रात तेलाच्या किमतीत घसरण दिसून आली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आणि बाजारात सकारात्मक वातावरण कायम राहिले.
सर्व क्षेत्रीय निर्देशांक वधारले
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्व क्षेत्र वधारुन बंद झाली. निफ्टी आयटी निर्देशांक 1.57टक्के , रिअल्टी 1.32टक्के , तेल आणि वायू 1.11 टक्क्यांनी आणि धातू निर्देशांक 1.07 टक्क्यांसह सर्वाधिक वाढ नोंदवली. याशिवाय, निफ्टी बँक, ऊर्जा, मीडिया, एफएमसीजी, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि फार्मा निर्देशांकांमध्येही मजबूती नोंदवली गेली.
मुख्य कंपन्यांपैकी 27 समभागांनी तेजी नोंदवली आहे. यामध्ये अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टीसीएस, इटरनल (झोमॅटो), कोटक महिंद्रा बँक आणि इन्फोसिस यांच्यात झाली, जी 2.4 टक्क्यांपर्यंत वाढले. अन्य कंपन्यांमध्ये या वेळी, टाटा मोटर्स, सन फार्मा आणि अदानी पोर्ट्स हे तीन समभाग प्रभावीत होत बंद झाले. टाटा मोटर्स 3.76 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक तोटा नोंदवला गेला.