बाजारात तेजी परतली, समभाग खरेदीत वाढ
जागतिक बाजारातही उत्साह : सेन्सेक्स हजार अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी मोठ्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजार मंगळवारी पुन्हा तेजीकडे परतताना दिसून आला. दिवसअखेर सेन्सेक्स 1000 अंकांनी आणि निफ्टी 374 अंकांनी वधारत बंद झाला.
सरतेशेवटी मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1089 अंकानी वधारून 74227 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 374 अंकांनी तेजी राखत 22535 अंकावर बंद झाला. आशियाई बाजारात सुद्धा मंगळवारी तेजी परतलेली दिसून आली. इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि लार्सन टुब्रो या समभागांनी जोरदार तेजी दाखवत बाजाराला आधार दिला.
सकाळी सेन्सेक्स निर्देशांक 900 अंकानी वाढत 74013 या स्तरावर सुरू झाला होता. निर्देशांकाने व्यवहारा दरम्यान 74859 पर्यंत मजल मारली होती. तर निफ्टी सकाळी 22446 च्या स्तरावर खुला झाला होता. मंगळवारी परतलेल्या तेजीमध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या खिशामध्ये 7 लाख कोटींची भर पडली आहे. बीएसईमधील सुचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 3,96,81,516.66 कोटी रूपयांवर पोहोचले आहे. सोमवारी सेन्सेक्स 2226 अंकानी कोसळत 73137 च्या स्तरावर घसरला होता. आतापर्यंतच्या व्यवहारात ही दुसरी मोठी घसरण बाजाराने सोमवारी नेंदविली होती.
जागतिक बाजारामध्ये मंगळवारी चांगली तेजी परतली होती. जपानचा निक्केई 6 टक्के वाढत व्यवहार करत होता. सदरचा निर्देशांक मागच्या सत्रामध्ये 1 ते सव्वावर्षाच्या नीचांकी स्तरावर पोहोचला होता. मंगळवारी मात्र जपानचा निर्देशांक सावरताना दिसला. अमेरिकेतील बाजारामध्ये सकारात्मकता दिसून आली. नॅसडॅक 1 टक्का वाढत व्यवहार करत होता. डो जोन्स 1 टक्का वधारलेला होता. जागतिक बाजारामध्ये परतलेल्या तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळाला.