जागतिक सकारात्मकतेत बाजारात परतली तेजी
सेन्सेक्स 454 अंकांनी मजबूत, बँकिंग कंपन्या चमकल्या
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणाचा परिणाम आणि बँकिंग तसेच धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या तेजीमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजार चांगल्या तेजीसमवेत बंद झाला. सेन्सेक्स 450 अंकांनी तर निफ्टी 141 अंकांनी वाढत बंद झाला.
सोमवारी सरतेशेवटी 30 समभागांचा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 454 अंकांनी वाढत म्हणजेच 0.59 टक्के तेजीसह 77073 वर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 141 अंक म्हणजेच 0.61 टक्के वाढत 23344 अंकांवर वाढत बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 17 समभाग तेजीसह आणि 12 समभाग घसरणीसोबत बंद झाले. कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी आणि एसबीआय यांचे समभाग सर्वाधिक तेजीत पहायला मिळाले. या सोबतच पॉवरग्रिड कॉर्प, टाटा स्टील, टेक महिंद्रा, एशियन पेंटस्, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टायटन, आयसीआयसीआय, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक आणि रिलायन्स यांचे समभागसुद्धा तेजी दाखवत बंद झाले.
हे समभाग घसरले
दुसरीकडे काही समभागांनी बाजाराला खाली खेचण्याचाही प्रयत्न केला. यामध्ये फास्ट फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो, अदानी पोर्टस, टीसीएस, महिंद्रा आणि महिंद्रा आणि मारुती सुझुकी यांचा वाटा सर्वाधिक राहिला. टाटा मोटर्स, आयटीसी, सन फार्मा, एचयूएल, अॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया, इन्फोसिस आणि इंडसइंड बँक यांचे समभाग देखील नुकसानीसोबत बंद झाले.
जागतिक बाजारात उत्साह
जागतिक बाजारामध्ये पाहता सोमवारी तेजीचा माहोल होता. आशियाई बाजारात टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग यांचे बाजार तेजीमध्ये पहायला मिळाले. युरोपातील सर्व शेअर बाजारानेसुद्धा नव्या उंचीवर झेप घेण्याचे कार्य केले आहे. शुक्रवारी अमेरिकेतील बाजार तेजीसमवेत बंद झाले होते.