रेपो दरात कपातीनंतरही बाजारात बुधवारी घसरण
सेन्सेक्स 379 अंकांनी घसरला : फार्मा कंपन्या दबावात
मुंबई :
जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणाचा परिणाम बुधवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स 379 अंकांसह घसरणीत राहिला. फार्मा कंपन्यांवर दबाव पहायला मिळाला. ट्रम्प यांच्या धोरणाचा परिणाम सातत्याने बाजारावर परिणाम करताना दिसतो आहे.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 379 अंकांनी घसरत 73847 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे 50 समभागांचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 136 अंकांनी घसरत 22399 च्या स्तरावर बंद झाला. ट्रम्प यांच्या व्यापारी शुल्काच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून याचाही दबाव विदेशातील बाजारांमध्ये तसेच भारतीय बाजारात पहायला मिळाला. फार्मा उद्योगावर कर लावण्याच्या अमेरिकेच्या शक्यतेमुळे भारतीय बाजारांमध्ये फार्मा क्षेत्रातील समभागांमध्ये दबाव पहायला मिळाला. फार्मा क्षेत्राचा निर्देशांक नकारात्मक कामगिरी करत जवळपास 2 टक्के इतका घसरलेला होता. बुधवारी सकाळी सेन्सेक्स 100 अंकांनी घसरत 74103 अंकांवर खुला झाला होता. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 73673 पर्यंत घसरला होता. रिझर्व्ह बँकेने बुधवारी पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कपातीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर बुधवारी फारसा पहायला मिळाला नाही. रेपो दरामध्ये पावटक्का कपात करण्यात आली असून नव्याने रेपोदर 6 टक्के इतका निश्चित करण्यात आला.
ट्रम्प यांनी प्रत्युत्तरादाखल चीनवर कराची मात्रा 104 टक्के इतकी केल्याने दोन्ही देशातील व्यापार युद्धाची चिन्हे अधिक गडद झालेली दिसून आली. याचा परिणाम विदेशातील बाजारांमध्ये पहायला मिळाला. अमेरिकेने चीनवर बुधवारपासूनच 104 टक्के व्यापारी शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. यातून आता दोन्ही देशांमध्ये तणाव अधिक वाढू शकतो.
जागतिक बाजारात दबाव
8 एप्रिल रोजी विदेशी गुंतवणुकदारांनी 4994. 24 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले आहेत. याच तुलनेमध्ये देशांतर्गत गुंतवणुकदारांनी 3097.24 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. विदेशामधील बाजारपेठ पाहता अमेरिकेतील बाजार घसरणीत होते. आशियाई बाजारात निक्केई आणि दक्षिण कोरियातील कोस्पी हेदेखील घसरणीत होते.