आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात घसरण
जागतिक अस्थिर स्थितीचा दबाव, रियल्टी कंपन्या नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअरबाजारासाठी आठवड्याचा पहिला दिवस निराशादायी ठरला. सेन्सेक्स 217 अंकांनी घसरणीत राहिला होता तर रियल्टी तसेच ऑइल आणि गॅस क्षेत्रातील समभागांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 217 अंकांनी घसरत 74115 च्या स्तरावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 92 अंकांनी घसरत 22460 च्या स्तरावर बंद झाला. शुक्रवारी भारतीय शेअरबाजार सपाट स्तरावर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 22 कंपन्या नुकसानीत होत्या तर 8 कंपन्यांचे समभाग तेजीत होते. सकाळी सेन्सेक्स तेजीसोबत खुला झाला आणि सत्रात एकावेळी 74,741 चा स्तरही सेन्सेक्सने गाठला होता. बाजार बंद होण्याआधी एकदम विक्रीवर जोर दिसून आला आणि सेन्सेक्स व निफ्टी नकारात्मक पातळीवर बंद झाले.
हे समभाग घसरणीत
इंडसइंड बँक, झोमॅटो, लार्सन टुब्रो, टायटन, महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रिज, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा आणि टीसीएस यांचे समभाग घसरलेले होते.
हे समभाग तेजीत
दुसरीकडे पाहता पॉवरग्रिड कॉर्प, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, एशियन पेंटस्, आयटीसी, सन फार्मा आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले होते. एकंदर बाजारात पाहता 1147 समभाग हे तेजीसोबत तर 2776 समभाग घसरणीत होते.
जागतिक स्थिती
जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर बाजारात दबाव पाहायला मिळाला. अमेरिकेत बेरोजगारी दर आणि टॅरिफ वाढवण्यासंदर्भातल्या हालचाली पाहता गुंतवणूकदार काहीसे साशंक दिसून आले. टोकियो, शांघाई, हाँगकाँग आणि सियोल यांचे बाजार मिळत्याजुळत्या कलासोबत बंद झाले. युरोपातील बाजारात काहीशी घसरण दिसून आली आहे.