इराण-अमेरिका शांतता कराराच्या घोषणेने बाजाराचा शेवट गोड
सेन्सेक्स 1695 अंकांनी जबरदस्त वधारला, रियल्टी, बँकांचे समभागांची खरेदी
वृत्तसंस्था मुंबई
इराण-अमेरिका यांच्यातील संभाव्य शांती कराराच्या घोषणेनंतर भारतीय शेअरबाजारात दमदार उसळी पहायला मिळाली. सेन्सेक्स 1695 अंकांनी तर निफ्टी निर्देशांक 461 अंकांनी वाढत शुक्रवारी आठवड्याचा शेवट गोड झाला.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1695 अंकांच्या तेजीसोबत 75527 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टीदेखील 461 अंकांनी वाढत 23622 च्या स्तरावर बंद होण्यात यशस्वी झाला होता. व्यवहारादरम्यान रियल्टी, प्रायव्हेट बँक, सरकारी बँक व फायनॅन्शीयल सर्व्हिसेस क्षेत्रातील समभागांनी सर्वाधिक तेजी अनुभवली होती. शेअरबाजाराची सुरुवात चांगल्या तेजीसह झाली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने बाजारात उत्साह संचारला. ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनेई यांनी नव्या कराराला मंजुरी दिल्याचा दावा केला. या करारांतर्गत इराण अण्वस्त्र ठेवणार नाही व करार झाल्यावर होर्मुझही खुला केला जाणार असल्याचे म्हटले आहे. याने बाजारात नव उत्साह संचारला. जागतिक तेलाचा पुरवठा यामुळे सुरळीत होऊन विविध देशांची अर्थव्यवस्था सुरळीत होणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह भरला होता.
शेअर बाजारात पाहता श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स व लार्सन टुब्रो यांचे समभाग सर्वाधिक तेजीत पाहायला मिळाले तर दुसरीकडे नेस्ले इंडिया, ओएनजीसी, टेक महिंद्रा यांचे समभाग मात्र सर्वाधिक घसरलेले होते. एवढेच नाही तर स्मॉलकॅप व मिडकॅप निर्देशांकानेही दमदार बॅटिंग केली. मिडकॅप 2.43 टक्के तर स्मॉलकॅप 2.8 टक्के इतका तेजीत होता.
विविध क्षेत्रांची कामगिरी पाहता रियल्टी व फायनॅन्शीयल सर्व्हिसेस निर्देशांक 3 टक्के इतके तुफान तेजी दर्शवत होते. आयटी निर्देशांक एकमात्र काहीसा कमकुवत कामगिरी करताना दिसला.
जागतिक बाजारात उत्साह
जागतिक बाजारात आशियाई बाजारात चांगली तेजी होती. तर गुरुवारी अमेरिकेतील बाजार तेजीसोबत बंद झाले होते. दक्षिण कोरीयाचा कोस्पी 4.63 टक्के तर जपानचा निक्केई 2.81 टक्के इतका वधारला होता. हाँगकाँगचा हँगसेंग 1.93 टक्के इतका तेजीत होता. डोव्ह जोन्स 1.86 टक्के तर नॅसडॅक 2.54 टक्के इतका वधारलेला होता. एस अँड पी निर्देशांकही 1.75 टक्के वधारला होता.