लक्ष्मीपूजन साहित्याने बाजारपेठ सजली
हळद-कुंकू, कमळगट्टा पूजेच्या संचाना मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळी सणानिमित्त घरोघरी लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाली असून, त्यासाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. लक्ष्मी-कुबेराच्या मूर्ती, हळद-कुंकू, अक्षता, कमळगट्टा, चांदीची नाणी, पूजेची ताटे, कलश, फुले आणि हार अशा विविध साहित्यांची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली आहेत. पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची एकाच ठिकाणी खरेदी करता यावी, यासाठी विव्रेत्यांकडून तयार पूजासंचही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
लक्ष्मीपूजनासाठी हळद, कुंकू, अष्टगंध, चंदन, गुलाल, बुक्का, अक्षता, सुपारी, खारीक, बदाम, नारळ, विड्याची पाने, आंब्याची पाने, कापूर, अगरबत्ती, धूप आदी साहित्याची खरेदी केली जात आहे. तसेच लक्ष्मी व कुबेराच्या मूर्ती, चांदीची नाणी, कमळगट्टा, कलश, तांब्या, पूजेचे पाट, आरतीचे ताट, घंटा आणि समई यांनाही मागणी आहे.
पूजेसाठी फुले, झेंडूचे हार, केळी, इतर फळे, मिठाई, पेढे, लाडू, खडीसाखर, खोबरे आदी नैवेद्याचे साहित्यही बाजारात उपलब्ध आहे. याशिवाय दिव्यांसाठी तेल, तूप, कापसाच्या वाती, पणत्या आणि निरांजन यांची खरेदी केली जात आहे. घरातील पूजेची जागा सजविण्यासाठी रांगोळीचे रंग, लक्ष्मीची पावले, तोरण तसेच पूजेचे वस्त्र यांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
व्यापाऱ्यांनी पूजेसाठी लागणारे छोटे-मोठे संच तयार केले असून, ग्राहक आपल्या गरजेनुसार साहित्याची खरेदी करत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे. परंपरेनुसार लक्ष्मीपूजन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची जुळवाजुळव करण्यात नागरिक व्यस्त असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे.
आज वसुबारस; दिवाळीला प्रारंभ
दिवाळी सणाचा प्रारंभ मानला जाणारा वसुबारस हा सण आजपासून पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. अश्विन कृष्ण द्वादशीला साजऱ्या होणाऱ्या या सणाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या निमित्ताने गाय आणि वासराची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
वसुबारसनिमित्त गाय व वासराला स्वच्छ धुऊन सजविले जाते. त्यांच्या कपाळावर कुंकू-हळद लावून फुलांच्या माळा घातल्या जातात. औक्षण करून गोडधोडाचा नैवेद्य दाखविला जातो. गायीला चारा व खाद्य देऊन पूजा केली जाते. गाय ही समृद्धी, मातृत्व आणि पोषणाचे प्रतीक मानली जाते. भारतीय संस्कृतीत पशुधनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या सणाने दिवाळीच्या उत्सवाला सुऊवात होते.
