एचडीएफसी-रिलायन्सच्या कामगिरीने बाजार तेजीत
सेन्सेक्स 181.87 तर निफ्टी 66.70 अंकांनी वधारले : नव्या सरकारकडून गुंतवणूकदारांना अपेक्षा
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी सलग तिसऱ्यांदा तेजीची नोंद केली आहे. या तेजीच्या कारणास्तव सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत राहिले आहेत. गुंतवणूकदारांना नव्या सरकारकडून नवीन अपेक्षा पूर्ण होणार असल्याच्या अपेक्षाही व्यक्त केल्या जात आहेत. याचाही फायदा आगामी काळात होण्याची शक्यता अधिक आहे.
देशातील सकारात्मक निर्यातीचे आकडे आणि मुख्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांच्या समभागांमधील खरेदीमुळे बाजाराला बळ मिळाले आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारात दुसऱ्या ट्रेडिंगमध्ये विक्रमी टप्पा गाठला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 181.87 अंकांनी वधारुन निर्देशांक 76,992.77 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 66.70 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 23,465.60 वर बंद झाला आहे. इंट्रा डे व्यवहारात निफ्टी सकाळच्या दरम्यान वक्रमी टप्प्यावर राहिला होता.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग हे 2.20 टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. यासोबतच टायटन, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोर्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग हे फायद्या राहिल्याची नोंद झाली आहे.
अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्राचे समभाग हे सर्वाधिक 1.38 टक्क्यांनी घसरुन बंद झाला. तर टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक, कोटक बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, स्टेट बँक व एनटीपीसी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
निर्यातीमध्ये वधार
भारतामध्ये मे महिन्यात वस्तुंची निर्यात ही 9 टक्क्यांनी वाढून 38.13 अब्ज डॉलरवर गेली आहे. जी एक वर्षापूर्वी समान महिन्यात 34.95 अब्ज डॉलर होती. उपलब्ध आकडेवारीनुसार आयात 7.7 टक्क्यांनी वाढून ती 61.91 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत गेली, जी 2023 मध्ये 57.48 अब्ज डॉलर होती.