चढउतारांच्या प्रवासात बाजार प्रभावीत
आयटी क्षेत्रातील समभागांची निराशादायी कामगिरी
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बाजारात काही प्रमाणात चढउताराची स्थिती राहिली होती. परंतु अंतिम क्षणी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये जागतिक बाजारपेठेत संमिश्र वातावरणात आयटी समभागांमध्ये विक्री झाली, खासगी बँकिंग समभागांमधील वाढीमुळे काही प्रमाणात तोटा भरून निघाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या साथीने बीएसई सेन्सेक्स 170 अंकांनी वाढून 74,270 वर खुला झाला होता. परंतु अंतिमक्षणी सेन्सेक्स 72.56 अंकांच्या घसरणीसह 0.1 टक्क्यांसह निर्देशांक 74,029.76 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 27.40 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 22,470.50 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये इंडसइंड बँक सर्वाधिक तेजीसह 5 टक्क्यांनी वाढले. बँकेचे सीईओ आणि ग्रुप चेअरमन यांनी गुंतवणूकदारांच्या चिंता कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनंतर समभागांमध्ये वाढ झाली. याशिवाय, टाटा मोटर्स, कोटक बँक, बजाज फायनान्स, आयटीसी, एचडीएफसी बँक आणि सन फार्मामध्येही 1 ते 3 टक्क्यांनी वाढ झाली.
अन्य कंपन्यांमध्ये, इन्फोसिसचे समभाग 4 टक्केपेक्षा जास्त घसरले. टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टीसीएस, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, झोमॅटो आणि एसबीआयमध्येही 3 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदली गेली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये घसरण
व्यापक बाजारात, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप दोन्ही निर्देशांक सुमारे 0.5 टक्क्यांनी बंद झाले. बाजारातील एकूण वातावरण नकारात्मक राहिले. सुमारे 2,500 समभाग खाली जात बंद झाले.
अमेरिकेत मंदी येण्याची आणि मॉर्गन स्टॅनली आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या डाउनग्रेडची भीती असल्याने आयटी निर्देशांक 3 टक्के पेक्षा जास्त घसरला. रिअल्टी निर्देशांक 1.7 टक्क्यांनी घसरला, तर धातू निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरला. खासगी बँकिंग क्षेत्राने ताकद दाखवली, निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांकात 0.7 टक्के वाढ झाली.
अमेरिकन बाजारात विक्री सुरूच
मंगळवार अमेरिकन बाजारात विक्री सुरूच राहिली. अमेरिकन व्यापार धोरणातील उलथापालथीमुळे बाजार आणि ग्राहकांचा विश्वास आणखी कमी झाला आहे. डाऊ जोन्स मंगळवारी जवळजवळ 500 अंकांनी घसरला, ज्यामुळे दोन दिवसांत त्याचा एकूण तोटा 1,400 अंकांवर पोहोचला.