मकर संक्रांतीसाठी बाजारपेठेत लगबग
नवीन वर्षातील पहिला सण : मकरसंक्रांत चार दिवसांवर : रंगीबेरंगी तिळगुळांचे आकर्षण : बाजारात विविध भाज्यांच्या आवकेत वाढ
बेळगाव : मकरसंक्रांत अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ संक्रांतीच्या साहित्याने बहरली आहे. विशेषत: रंगीबेरंगी तिळगूळ आणि इतर साहित्याची विक्री होऊ लागली आहे. भोगी आणि मकर संक्रांतीसाठी बाजारात महिलावर्गाचीही लगबग वाढू लागली आहे. विशेषत: संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेले विविधरंगी तिळगूळ आकर्षण ठरू लागले आहेत. बाजारात तिळगूळ, तिळाचे लाडू, साखरेचा हलवा आणि इतर साहित्य दाखल झाले आहे. मंगळवार दि. 14 रोजी मकरसंक्रांत सण आहे. नवीन वर्षातील पहिला सण उत्साहात साजरा करण्यासाठी रेलचेल सुरू आहे. भोगी आणि मकरसंक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारात शनिवार आणि रविवारी गर्दी वाढणार आहे. साखरेच्या किमती वाढल्याने तिळगूळ दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या संक्रांतीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
मकर संक्रांतीसाठी तिळगूळ, तिळाचे लाडू, तिळ भाकरी, गूळ पोळी आदी साहित्याची विक्री होऊ लागली आहे. यंदा तिळगुळाचा दर थोडा वाढला असून 50 ते 60 रुपये किलो दराने विकला जात आहे. त्याबरोबरच तयार लाडू, चिक्की यासह तिळगुळाचे दागिने आदी पदार्थही दाखल झाले आहेत. गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली यासह शहापूर, वडगाव, खासबाग, अनगोळ व उपनगरांमध्येसुद्धा तिळगुळासह संक्रांतीच्या विविध साहित्याची विक्री होऊ लागली आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून 10 आणि 20 रुपयांचे तिळगूळ पाकीट विक्री होत आहे. मकर संक्रांतीसाठी तिळाची मागणीही वाढू लागली आहे. त्याबरोबरच विविध चटण्या आणि तयार भाकरीही दाखल झाल्या आहेत. विशेषत: रविवारी या साहित्याची मागणी अधिक प्रमाणात वाढणार आहे.
आकर्षक तिळगूळ-डबे
बाजारात विविध रंगीबेरंगी तिळगूळ आणि तिळगूळ ठेवण्यासाठी आकर्षक डबे दाखल झाले आहेत. लहान मुलांसाठी विविध आकारांमध्ये आकर्षक तिळगूळ डबे विक्री होऊ लागले आहेत. भोगीच्या पार्श्वभूमीवर शेंगा, हिरवा वाटाणा, सोले आणि इतर भाज्यांचीही आवक वाढू लागली आहे.