अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला बाजारात उत्साह
सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला : रिलायन्सचे समभाग तेजीत
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात पुन्हा तेजीचे वातावरण राहिल्याचे दिसून आले. केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याच्या पूर्वसंध्येला भारतीय बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारल्याचे दिसून आले. यामुळे 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात काय सादर केले जाणार याची सर्व क्षेत्रातून असणारी उत्सुकता व लोकसभा निवडणूक पार्श्वभूममीवर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांकडून अपेक्षा आहेत.
फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरा संदर्भात बैठक होण्याच्या अगोदरच भारतीय बाजारात तेजीची नेंद केली आहे. बुधवारच्या सत्रात एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभाग खरेदीमुळे बाजाराला समर्थन मिळाले. सुरवातीला बाजार काहीशा घसरणीसोबत खुला झाला होता, परंतु त्यानंतर बाजाराने तेजी प्राप्त करण्यास सुरुवात केली.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 612.21 अंकांनी वधारुन निर्देशांक 71,752.11 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 203.60 वधारुन निर्देशांक 21,725.70 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यामध्ये सेन्सेक्समध्ये सनफार्मा, टाटा मोर्ट्स, भारतीय स्टेट बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रिड आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये लार्सन अॅण्ड टुब्रोचे समभाग हे चार टक्क्यांनी घसरणीत राहिले आहेत. डिसेंबर तिमाहीच्या पार्श्वभूमीवर टायटनसह अन्य कंपन्या नुकसानीत राहिल्या आहेत.
जागतिक बाजारांची स्थिती
जागतिक पातळीवरील बाजारांमध्ये आशियातील जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट तसेच हाँगकाँगचा हँगसेंग हे घसरणीत राहिले. दक्षिण कोरियाचा कॉस्पी हा तेजीसह बंद झाला आहे.
बजेट व फेडरलच्या बैठकीवर बाजाराचा प्रवास?
आजच्या दिवशी भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांची नजर ही केंद्रीय अर्थसंकल्प आणि फेडरल रिझर्व्ह यांच्या होणाऱ्या बैठकीमधील निर्णयावर होती.